

Nanded News: After Umap, District Collectors raid on sand mafias
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलोभ रोहन यांनीही मुदखेड तालुक्यात धडक मोहीम राबवली. हरित पट्टा घोषित असलेल्या मुदखेड तालुक्यातील महाटी येथे झालेल्या कारवाईत ४ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पाच हायवा, एक टिप्पर आणि सहा जेसीबी ताब्यात घेण्यात आले, तर त्यानंतरच्या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींवरही प्रशासनाने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. सलग दोन दिवस झालेल्या या कारवायांमुळे मुदखेडसह उमरी तालुक्यातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
शहाजी उमाप यांच्या पथकाने १० ऑक्टोबर रोजी कारवाई केली, तर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलोभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली ११ ऑक्टोबर रोजी पुढील कारवाई करण्यात आली. गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने दाखवलेली ही सक्रियता महत्त्वाची मानली जात आहे. पहिल्या कारवाईत जप्त केलेल्या वाहनांपैकी काही वाहनांवर क्रमांक नसल्याचेही समोर आले होते. या प्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुदखेड तालुक्यात वाळू उपशावर निर्बंध असतानाही गोदावरी नदीच्या महाटी, खुजडा, वासरी, माळकोटा, टाकळी आणि शंखतीर्थ घाट परिसरात अवैध उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे. पहिल्या दिवशी हायवा आणि जेसीबीवर कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोटींच्या दिशेने प्रशासनाने मोर्चा वळवला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांनी केलेल्या महाटी (ता. मुदखेड) आणि कौडगाव (ता. उमरी) या कारवाईत अनेक बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी दिली. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत तहसीलदार देऊळगावकर कारवाईच्या प्रक्रियेत व्यस्त होते.
सलग दोन दिवसांच्या कारवायांमुळे अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांपासून बोटींपर्यंत प्रशासन पोहोचल्याचे चित्र आहे. मात्र, शासनाचे निर्बंध असतानाही नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरू कसे राहिले, हा प्रश्न कायम आहे. वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल यंत्रणेतील संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती होती का? माहिती असूनही वेळेत कारवाई का झाली नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
शहाजी उमाप यांच्या पथकाच्या कारवाईत मुदखेड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गणेश कराड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव आणि राजेश नंद सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कारवाईची व्याप्ती वाढवल्याने अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, ही मोहीम केवळ दोन दिवसांपुरती मर्यादित न राहता अवैध उत्खननाचे मूळ नष्ट करणारी ठरणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.