

Kahala Ganja Raid Youth Arrested
नायगाव : नायगाव तालुक्यातील बरबडा पोलीस चौकीच्या हद्दीतील कहाळा येथे अवैध गांजा विक्रीविरोधात कुंटूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नीलब रोहन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले व पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव यांच्या पथकाने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई केली.
राहत्या घरासमोर सुरू होती विक्री
कहाळा येथील रतन भगवान गिरी (वय २०) हा तरुण स्वतःच्या राहत्या घरासमोर गांजाची अवैध विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी नायगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, दोन शासकीय पंच, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
यावेळी रतन गिरी याच्याकडे ६९० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०१/२०२६ नुसार एनडीपीएस अधिनियम १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(ब)(२)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल भोसले करीत आहेत.