

Naigaon taluka Flood affected report
नायगाव : ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यात सुमारे १३०० घरांची पडझड झाली होती. ग्रामसेवक व सरपंचांनी गावनिहाय पंचनामे करून अहवाल पंचायत समिती कार्यालयात सादर केले. मात्र हे अहवाल तहसील कार्यालयापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे पडझड बाधितांचा संपूर्ण अहवाल शासनाकडे न गेल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व उपविभागीय अधिकारी डोंबे यांनी दोन ते तीन वेळा पंचायत समितीला लेखी आदेश दिले, तोंडी सूचना दिल्या, तरीसुद्धा संबंधित अभियंत्याच्या निष्क्रियतेमुळे अहवाल तहसील कार्यालयात सादर झाला नाही.
यामुळे शेकडो नागरिकांना शासकीय मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनातील उदासीनतेबद्दल जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंचायत समितीचा कारभार मात्र “उंटावरून शेळ्या हाकण्याचा” वाटत असून, लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे दुर्लक्ष करत असल्याने सामान्य नागरिकांना अन्याय सहन करावा लागत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया लाभधारकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.