

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील १ नगर पंचायत आणि १२ नगरपरिषदांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी कामगिरीबद्दल आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या निकालातून केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाचा आवाका जिल्ह्यात किती मोठा आहे? याचे चित्तन जिल्ह्यातील जबाबदार नेत्यांना करणे नकीच गरजेचे आहे. १२ पैकी ३ नगराध्यक्ष, उमेदवार उभे करण्यात तिसरा क्रमांक, दोन ठिकाणी खातेही उघडता आले नाही, एका नगरपरिषदेत उमेदवार न देता स्थानिक आघाडीला छुपा पाठिंबा ही भाजपची सध्याची अवस्था आहे. २०१९मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या भरीव यशानंतर पक्षाच्या यशाचा आलेख कसा उतरत गेला पाचेही आत्मपरिक्षण व्हायला हवे.
जिल्ह्यात हिमायतनगर नगरपंचायतीसह किनवट, हदगाव, भोकर, मुदखेड, उमरी, धर्माबाद, कुंडलवाडी, देगलूर, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा वा नगरपरिषदांसाठी सुरुवातीला २ डिसेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यात धर्माबाद आणि मुखेड या दोन नगरपरिषदांसह भोकर, लोहा आणि कुंडलवाडीतील तीन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान पार पडले. २१ डिसेंबर रोजी झालेल्या निकालात भाजपच्या वाटघाला आलेले यश किती निराशाजनक आहे, हे सिद्ध झाले. जिल्ह्यात राज्यसभेचे दोन खासदार, ५ आमदार असूनही पक्षाची झालेली निकट अवस्था कार्यकर्त्यासाठी निश्चित चिंताजनक आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने २२१, काँग्रेसने २१४ तर भाजपाने केवळ २०६ जागांवर उमेदवार दिले. उमेदवार उभे करण्यातही भाजपचा तिसरा क्रमांक आहे.
रविवारी आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस ७१ तर भाजप ७४ जागांवर विजयी ठरली, याचा अर्थ भाजपा आणि राष्ट्रवादी जवळपास बरोबरीत आहेत. राष्ट्रवादीचा एक आमदार आणि भाजपाचे राज्यसभेचे दोन खासदार, ५ आमदार आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपाने १२ ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले, त्यापैकी केवळ ३ उमेदवार विजयी ठरले आहेत. म्हणजे भाजपासाठी हा निकाल केवळ २५ टक्क्यावर आला आहे.
पवार, अंतापूरकरांना हिसका आ. राजेश पवार यांना उमरी आणि धर्माबादेत मतदारांनी चांगलाच हिसका दाखवला. उमरीत भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले, तर धर्माबादेत मजपाच्या झंझावात त्यांचा काहीच टिकाव लागला नाही, येथे भाजपाला केवळ ७ जागा मिळाल्या. आ. जीतेश अंतापूरकर यांचीही कामगिरी यापेक्षा काही वेगळी नाही. देगलूरमध्ये मतदारांनी त्यांना जबर हिसका दाखवला. तेथे भाजपा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची अनामत रकमच जप्त झाली. बिलोलीत त्यांना भाजपाच्या चिन्हावर एकही उमेदवार देता आला नाही. अशी दयनीय अवस्था असलेल्या अंतापूरकरांना कुंडलवाडीत भाजपाला मिळालेल्या यशाचे श्रेय का द्यायचे? हा प्रश्न आहे.
राठोड यांनी गड राखला, पण..
मुखेडमध्ये भाजपाचे १४ नगरसेवक विजयी झाले, परंतु नगराध्यक्षपदाचा उमेदवार आ. तुषार राठोड यांना निवडून आणता आला नाही. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्यातील दुसरी जाहीरसभा झाली. अवघ्या ६ जागा पटकावणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या झोळीत नगराध्यक्षपदाची माळ पडली. ही किमया कशी घडली? याचा आढावा तुषार राठोड यांना घ्यावा लागणार आहे. किनवटमध्येही तेच झाले. शिवसेना उबाठा गटाचे केवळ ३ नगरसेवक विजयी झाले, परंतु नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आल्याने या पक्षाने उभारी घेतली. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना प्रत्येकी ५ तर भाजपाच्या पदरात केवळ ४ जागा मिळाल्या. आ. भीमराव केराम यांची येथील कामगिरी निराशाजनक ठरली.
राष्ट्रवादी सरस
मागील निवणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकाही नगरपरिषदेवर सत्ता नसताना या निवडणुकीत ३ नगरपरिषदांवर झेंडा फडकवला आहे. शिवाय या पक्षाचे ७० नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सरस मानली जात आहे. नेते व कार्यकत्यांचा आत्मविश्वास वाढविणारे राष्ट्रवादीचे हे यश असून मनपा निवडणुकीत भाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.