

हिंगोली: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेणे निश्चित केले असेल तर तो काँग्रेससाठी एक जबर झटका ठरेल.
हिंगोली जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. पुढील काही दिवसांतच त्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी संबंधित नेत्याने त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचा संदेश दिला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा बडा नेता म्हणजे आमदार प्रज्ञा सातव असल्याचे सांगण्यात येत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील 4 महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालु्क्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या शिवाय शरद पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचा एक चेहरा भाजपाच्या गळाला लागला आहे. त्यासाठी मुंबईत राजकीय हालचाली सुरु झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपमध्ये जाणाऱ्या या नेत्याने त्यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत पोहोचण्याचे संदेश पाठविले आहेत. त्यानुसार काँग्रेसचे काही कार्यकर्ते बुधवारी (दि.17) मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच नेत्याचा भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. मुंबईकडे रवाना झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याला नेत्याने मुंबईत बोलावल्याचे स्पष्ट केले. पण त्यांचा भाजपा प्रवेश आहे किंवा नाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तूर्तास या पक्ष प्रवेशाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. पण पुढील काही दिवसांतच हा पक्ष प्रवेश होईल अशीही खात्रीलायक माहिती आहे. या चर्चेमुळे आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेस दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव 2014 ते 2019 या कालावधीत हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ख्याती होती. पण 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी, 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2030 मध्ये संपणार आहे.