

Umarkhed Missing Gold Ornaments
उमरखेड : उमरखेड शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा बाजार समितीचे संचालक राधेश्याम भट्टड यांच्या पत्नीचे गहाळ झालेले सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने उमरखेड पोलिसांनी तत्परतेने शोधून काढत मूळ मालकाकडे परत केले. बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
राधेश्याम भट्टड यांच्या पत्नी २६ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने घेऊन सराफा दुकानाकडे जात होत्या. त्यावेळी पाऊचमधील सुमारे सात तोळे वजनाचे विविध सोन्याचे दागिने कुठेतरी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी उमरखेड पोलिस ठाण्यात अर्ज देऊन याबाबत माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी ठाणेदार अमोल गुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दागिन्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्या पथकाने गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान हे दागिने बिटरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेला सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली असता तिने दागिने सापडल्याचे मान्य केले. त्यानंतर तिने पोलिसांच्या समक्ष सर्व दागिने सुपूर्द केले. पोलिसांनी सात तोळे वजनाचे, अंदाजे १० लाख रुपये किमतीचे सर्व सोन्याचे दागिने राधेश्याम भट्टड यांच्याकडे सुरक्षितपणे परत केले.
ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उमरखेडचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी गौरव कायंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी ठाणेदार अमोल गुंडे, स.पो.नि. व्यंकट गंगलवाड, स.पो.नि. विनायक रामोड, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, सहायक फौजदार विजय पंतगे, पोलीस हवालदार चंदन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संघशील टेंभरे, विष्णू राठोड, दिगांबर गिते, निवृत्ती महालनकर, अंबादास गवारे आदींचा पथकात सहभाग होता.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अल्पावधीत मौल्यवान दागिन्यांचा शोध घेऊन ते सुरक्षितपणे मालकाच्या स्वाधीन करण्याची कामगिरी उमरखेड पोलिसांनी केली.