

Loha illegal sand transport
फुलवळ : कंधार तालुक्यातील महसूल विभागाने अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत रविवारी पहाटेच एका हायवा टिप्पर जप्त केला. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारींनंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि कंधारचे तहसीलदार व प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
नायब तहसीलदार रेखा चामनर यांच्या नेतृत्वाखालील पथकात मंडळ अधिकारी एस. आर. शेख, ग्राम महसूल अधिकारी बालाजी केंद्रे, शिपाई शिवराज लघुळे, वाहन चालक मिर्झा समीर बेग व दफेदार ज्ञानेश्वर राखे यांचा समावेश होता.
रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथून विनापरवाना वाळू घेऊन जळकोट जांब येथे जात असलेला हायवा (MH 26 BH 0011) हरबळ (प. क.) परिसरात थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनातील तीन ब्रास विनापरवाना वाळूसह हायवा जप्त करून कंधार तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.
हा हायवा लोहा तालुक्यातील पेनुर गावातील नवनाथ मारुती गवते यांच्या मालकीचा असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, सामान्य जनतेत तसेच घरकुल लाभधारकांमध्ये महसूल विभागाच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.