

Loha Husband Tower Protest
लोहा : पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून एका तरुणाने सोमवारी (दि. ७) सकाळी मोबाईल टॉवरवर चढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. पत्नीला नांदायला पाठवा, अशी मागणी करणारे बॅनर टॉवरवर लावून हा तरुण टॉवरच्या टोकावर जाऊन बसला. या प्रकाराची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
शादुल मकदुम दौलताबादी (रा. बेटमोगरा, ता. मुखेड, जि. नांदेड) असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा विवाह लोहा येथील आफिया गफार घोडके यांच्याशी १९ एप्रिल २०२४ रोजी वसरणी, नांदेड येथे झाला होता. लोहा ही त्याची सासरवाडी आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने बसस्थानकाजवळील मोबाईल टॉवरवर चढून पत्नीला नांदायला पाठविण्याची मागणी केली.
या तरुणाने यापूर्वीही पत्नीसाठी अशाच प्रकारचे आंदोलन केले होते. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला टॉवरवरून खाली उतरवले होते. त्यानंतर पुन्हा त्याने सोमवारी त्याच प्रकारे टॉवरवर चढून आंदोलन केल्याने शहरात चर्चेला उधाण आले.
घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिकांनी टॉवर परिसरात गर्दी केली. काही नागरिकांनी त्याला खाली उतरून चर्चा करण्याचे आवाहन केले; मात्र तो खाली येण्यास तयार नव्हता. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली उतरवले आणि लोहा पोलीस ठाण्यात नेले.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार या पती-पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी सोडचिठ्ठी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.