

मुखेड (नांदेड) : लेंडी प्रकल्प क्षेत्रातील गावच्या गावे पाण्यात बुडणे हे नैसर्गिक नसून शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या जबरदस्तीच्या घळभरणीमुळे झाले असून आपतग्रस्तांसाठी बनविण्यात आलेल्या शेडच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषदेतून केला आहे.
मुखेड येथील माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरकर यांच्या संपर्क कार्यालयात प्रदेश महासचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. अनेक गावे पाण्याखाली गेल्यानंतरही शासनाचे प्रतिनिधी दोन दिवस फिरकले नाहीत. सर्वात प्रथम लोकनियुक्त खासदार प्रा. रवींद्र चव्हाण आणि माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी सर्वात आधी पूरग्रस्त भागात जाऊन त्यांना दिलासा दिला.
शासनाचे प्रतिनिधी अर्थात या तालुक्याचे आमदार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि पालकमंत्री यांनी अनुक्रमे दोन तीन आणि आठ दिवस उलटल्यानंतर पोहोचले. केवळ मृतांना शासनाच्या अनुदानाशिवाय संकटग्रस्तांना अद्याप शासनाची कुठलीच मदत पोहोचली नाही. याउलट काँग्रेसकडून बेटमोगरेकर परिवार आणि माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी सतत मदतीचा ओघ चालू ठेवला आहे. मुखेड शहराध्यक्ष हनमंत नारनाळीकर यांनी काल झालेल्या शहरातील नरसी लातूर मार्गावरील अतिक्रमण काढण्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. संपूर्ण शहर अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे, असे आमचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.श्रावण रॅपनवाड, हणमंत नारनाळीकर, संभाजी पाटील उंदरीकर, जयप्रकाश कानगुले, विद्याधर साखरे, इमरान पठाण, एम.आर.गोपनर, बालाजी साबणे, बालाजी वाडेकर, केतन मामडे, मुजीब सय्यदसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लेंडी प्रकल्प बाधित गावच्या पूर्ण लोकांचे पुनर्वसन न करता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी जिद्दीने पोलिस बळाच्या जोरावर घळभरणी करून पाणी अडवल्याने आणि धरणाचे गेट बंद ठेवल्यानेच हे संकट उद्भवले. हे नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहे. आपत्तीग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या शेडमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठवून भागणार नाही तर तिडकेंसह संबंधित सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींवर सदोष मनुष्यवधाचा आणि झालेल्या नुकसानीबद्दल गुन्हे दाखल करून सदर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केली.