

Kinwat bear attack
किनवट : दयाळधानोरा (कि.) येथे मंगळवारी मध्यरात्रीनंतर मादी अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दत्ता बळीराम जाधव यांच्या वारसदारांना शासनातर्फे दहा लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी (दि.13) दुपारी एकच्या सुमारास प्रदान करण्यात आला.
आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत अप्पारावपेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) उमेश ढगे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. मंगळवार (दि.10) रोजी मध्यरात्रीनंतर जाधव हे शेतातील मका पिकास पाणी देण्यासाठी गेले असता आपल्या मृत पिलाच्या शोधात असलेल्या चिडलेल्या मादी अस्वलाने त्यांच्यावर भीषण हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मदतीस धावून गेलेल्या इतर आठ जणांवरही अस्वलाने हल्ला केला. त्यापैकी चार जण गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभाग व रेस्क्यू पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून तब्बल 18 तासांच्या प्रयत्नानंतर मक्याच्या शेतात लपलेल्या त्या मादी अस्वलास पकडण्यात यश मिळविले. यावेळी सहायक वनसंरक्षक इटलोड, वनविकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापक पऱ्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, प्रमोद राठोड, वनपाल व्ही. एस. गुट्टे, दीपाली सोनाळे व इतर कर्मचारी घटनास्थळी कार्यरत होते.
या घटनेची माहिती मिळताच आमदार भीमराव केराम यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळे व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून मृत व जखमींच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तिसऱ्याच दिवशी शासकीय मदत वितरित करण्यात आली. मृत दत्ता जाधव यांचे मुलगे संजय दत्ता जाधव, संदीप दत्ता जाधव तसेच मुली देवकाबाई सुनील रण्डी व करूणाताई दुर्गादास डे यांना दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी श्रीराम व्ही सज्जन, मलकजाम (अ.) येथील वनरक्षक डी. डी. कडमपल्ले, शिवणीचे वनपाल सय्यद वसीम, वनरक्षक कृष्णा घायाळ, आर. आर. वनवे, संतोष बारगुडे, गणेश सपकाळ, बी. टी. जाधव, विठ्ठल घुले, वनमजूर पी. पी. चिंतले, ज्ञानेश्वर माहूरे, संगणक चालक कुलदीप पाटील आदी उपस्थित होते.