

Nanded is ready for 'Hind-Di-Chadar'!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : सन २००८ साली गुरू-ता-गद्दी त्रिशताब्दी सोहळा यशस्वीपणे साजरा केल्यानंतर नांदेडची ऐतिहासिक भूमी आता 'हिंद-दी-चादर' सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवार आणि शनिवारी वरील सोहळा होत असून तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शासन आणि स्थानिक गुरुद्वारांची मोठी यंत्रणा कार्यरत आहे.
नांदेडच्या दक्षिणेकडील ५२ एकराच्या भव्य मैदानामध्ये होणाऱ्या वरील कार्यक्रमस्थळी विशेष मंचावर श्री गुरू ग्रंथ साहिब विराजमान राहणार आहेत. या विशेष सोहळ्यानिमित्त शनिवारी सकाळी तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वारापासून वरील मैदानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजविण्यात येणार आहे.
वरील कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री भगवतसिंग मान यांच्यासह अनेक नेते नांदेडमध्ये येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे स्थानिक नेते खा. अशोक चव्हाण यांनी वरील कार्यक्रमाचे आयोजन आणि व्यवस्थेमध्ये विशेष लक्ष घातले आहे. शुक्रवारी दुपारी त्यांनी कार्यक्रमस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन तयारीची माहिती घेतली. कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागांतील, विविध जाती-धर्मांतील भाविक मोठ्या संख्येने नांदेडमध्ये येणार असल्यामुळे वाहतूक आणि वाहनतळांची आवश्यक ती व्यवस्था स्थानिक प्रशासनाने केली आहे. वरील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक नांदेडमध्ये आले आहेत.
राज्यात यापूर्वी नागपूर येथे भव्य कार्यक्रम पार पडला. नांदेडमधील कार्यक्रम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात मुंबई येथेही कार्यक्रम होणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. वरील मैदानावर गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.
शाळांना सुटी
दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनुचित घटना घडू नये, आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी नांदेड शहर आणि तालुक्यातील सर्व शाळांना शनिवारी सुटी 'हिंद-दी-चादर' कार्यक्रमासाठी राज्यातील १२ जिल्ह्यांतील तसेच देशातील विविध राज्यांतील लाखो भाविक नांदेड शहरात येण्याची शक्यता आहे. दोन जाहीर करण्यात आली आहे.