

भोकर (नांदेड) : सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सर्रासपणे तोडण्यात आलेल्या झाडाप्रती वनविभागाच्या संवेदना बोथट झाल्या होत्या. तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. पण आता नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी अंगद खटाणे यांनी या बाबत सौरऊर्जा टाकणाऱ्या कंपनीना नोटीस दिली असून अवैध वृक्षतोड करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
निसर्ग आणि पर्यावरण हेच जीवनाचे आधार आहे. वृक्ष नाही तर जीवनसुद्धा नाही. जागतिक तापमान वाढ होत असल्याचा परिणाम आपल्याला जाणवत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातून पक्षी, प्राण्यांची संख्या कमी होत असून, प्राचीन वृक्षजातीही कमी झाल्या आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून असलेली अवर्षणाची परिस्थिती ही केवळ पर्यावरण ऱ्हासामुळे झाली आहे.
सोलार प्लांटसाठी वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र व वृक्षतोड परवानगी आवश्यक आहे. मात्र आजपर्यंत एकही एजन्सीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. परंतु काही एजन्सींनी ना हरकत न घेताच काम सुरू केले आहे. त्याना नियमानुसार नोटीस देण्यात आली आहे. जर सोलर एजन्सी यांनी अवैध वृक्षतोड केलेले निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात येईल.
अंगद खटाणे वनपरिक्षेत्र अधिकारी, भोकर, नांदेड.
बेसुमार वृक्षतोड व प्रदूषण हे यास कारणीभूत आहेत. हे असच पुढे चालू राहिले तर जिवंत राहणं कठीण होणार असल्याचे भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे. यामुळे वनविभागाने वन संपत्ती राखावी नव्हे तर यात वाढ करावी अशी अपेक्षा असते. पण, भोकर तालुक्यात शेतकऱ्यांची शेती भाडेतत्त्वावर घेऊन या शेतीत सौर ऊर्जा प्लांट उभा करण्यासाठी अनेक कंपनी पुढे आल्या आणि तालुक्यातील अनेक गावांत सौर ऊर्जा प्लांट उभा केला गेला. हा प्लांट उभा करताना हजारो झाडे नष्ट केल्या गेले. वृक्षतोडीमुळे अनेक दुष्परिणाम भोगत असताना तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांनी मात्र याकडे जाणीव-पूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे वृक्षतोड करणाऱ्या कंपनीला बळ आले होते. या वृक्षतोडबाबत नव्याने रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी अंगद खटाणे यांनी कडक भूमिका घेतली आहे. झालेल्या वृक्षतोडीबाबत काही कंपन्यांना नोटिसा दिल्या असून ज्या कंपनीने अवैध वृक्षतोड केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्याची भूमिका घेतली आहे.