

नांदेड : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर, सोनखेड पोलिसांनी अवैध वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रातून शासनाची कोणतीही परवानगी किंवा रॉयल्टी न घेता चोरटी रेती वाहतूक करणारे तीन हायवा ट्रक आणि १५ ब्रास रेती असा एकूण १ कोटी २० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ३ आणि ५ नोव्हेंबर २०२६ रोजी राबवलेल्या या धडक मोहिमेत ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सोनखेड पोलीस ठाण्याचे पथक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गस्त घालत असताना, त्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी विनापरवाना रेती वाहून नेणारे हायवा ट्रक आढळले. पहीली कारवाई मौजे दापशेड रोडवर हायवा ट्रक (क्र. MH 26 CV 4285) मधून ५ ब्रास रेती जप्त करण्यात आली.
चालक ओमकार प्रकाशराव भुजबळ (रा. शेलगाव, ता. लोहा) याच्यासह अज्ञात वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी कारवाईत सोनखेड ओव्हरब्रिज रोडवर हायवा ट्रक (क्र. MH 26 CT 1450) अडवून तपासणी केली असता, ५ ब्रास अवैध रेती मिळून आली.
चालक कैलास उद्धव रेनके (रा. बेनाळ, ता. लोहा) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये प्रत्येकी ४० लाख रुपयांच्या हायवा ट्रकासह ३०-३० हजार रुपयांची रेती, असा एकूण ८० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बेटसांगवी परिसरात तिसरी कारवाई
तसेच, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास बेटसांगवी शिवारात गस्त घालत असताना पोलिसांनी पिंपळगाव (निमजी) कडून येणारा हायवा ट्रक (क्र. MH 20 EG 6444) थांबवला. या वाहनाची पाहणी केली असता, गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना चोरून आणलेली ५ ब्रास रेती त्यात आढळली. चालक मारोती नागोराव कदम (रा. सावरगाव नसरत) आणि वाहन मालक चांदू व्यंकटी डक (रा. पिंपळगाव निमजी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईतही ४० लाख रुपयांचा हायवा आणि रेती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.