

Himayatnagar Interstate Gang Alert
हिमायतनगर : आंतरराज्यीय चोरांच्या टोळीच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर तालुक्यात पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन रात्रीच्या वेळी गस्त घालावी तसेच गावात दिवसा किंवा रात्री अनोळखी अथवा संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गावातील पोलिस पाटील यांना सूचना देण्यात आल्या असून, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्रीच्या वेळी गावात गस्त ठेवावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोलिस पाटील व ग्रामस्थांकडून रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. गावात येणाऱ्या-जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
चोरांच्या टोळीच्या चर्चेमुळे ग्रामीण भागातील नागरिक, विशेषतः शेतकरी व महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील कामांसाठी जाणाऱ्या महिला मजुरांमध्येही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी घराच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यासोबतच गावात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कायदा हातात न घेता तातडीने पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी. सतर्कता आणि नागरिक-पोलिस समन्वयातून चोरीच्या घटना रोखण्यास मदत होईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.