

Fuel Shortage Himayatnagar
हिमायतनगर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या नांगरणी आणि पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असताना हिमायतनगर तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शहरासह सोनारी फाटा आणि परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या तब्बल एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना १० ते १२ तास रांगेत उभे राहावे लागत असून, अनेकांची शेती मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. तालुक्यात पाच पेट्रोल पंप असतानाही डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लग्नसराई आटोपल्यानंतर शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. मात्र शेती मशागतीसाठी आवश्यक असलेले डिझेल वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. दिवसभर ट्रॅक्टर रांगेत उभे राहत असून अनेकांना रात्रभर पंपांवर थांबावे लागत आहे.
एकीकडे बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकरी धावपळ करत असताना दुसरीकडे मशागतीसाठी आवश्यक डिझेल मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबतही अद्याप बँकांकडून कोणतीही स्पष्ट सूचना मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा, नांदेड-किनवट मार्गावरील पेट्रोल पंप तसेच ढाणकी-पळसपूर रोडवरील पंपांवरही अशीच परिस्थिती असून वारंवार लांबच लांब रांगा लागत आहेत. प्रशासनाकडून या डिझेल टंचाईची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तहसील प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांच्या स्टॉक रजिस्टरची तपासणी करून परिस्थितीची चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, काही पेट्रोल पंप चालकांकडून मनमानी पद्धतीने डिझेलचे वितरण केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
“शेतकऱ्यांची थट्टा सुरू” : श्रीदत्त पाटील पवार
काँग्रेस कार्यकर्ते श्रीदत्त पाटील पवार सोनारीकर यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना उन्हात तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा दावा करणाऱ्या शासनाने प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले असल्याची टीकाही त्यांनी केली.