

Himayatnagar water grid scheme
हिमायतनगर : एप्रिलच्या अखेरीस तापमानाचा पारा चढत असताना हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. घरगुती बोअरवेल, तसेच शेतशिवारातील सिंचन विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील एकूण ३८ गावांमध्ये सुरू असलेली वॉटर ग्रीड योजना गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे या योजनेची कामे अपूर्णच राहिली असून, लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या पाण्याच्या टाक्या केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कारला आणि पाचोंडी या गावांमध्ये ग्रीड व जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी कामे हाती घेण्यात आली होती. नागरिकांना घरपोच पाणी मिळावे, यासाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. काही ठिकाणी घरगुती नळजोडण्या देखील देण्यात आल्या आहेत, तसेच पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. मात्र, कारला गावात टाकीचे काम अर्धवट सोडून ठेकेदार फरार झाल्याची माहिती आहे. याशिवाय कामावर देखरेख करणारे अभियंतेही समाधानकारक उत्तरे देत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडले आहे.
योजनेची कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा कधी सुरू होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पंचायत समिती स्तरावर पाणीटंचाई निवारणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची गरज असतानाही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्यातील अनेक वाड्या-तांड्यांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांना दिवस-रात्र बोअरवेलसमोर रांगा लावून पाणी मिळवावे लागत आहे. अद्याप एकाही गावात टॅंकरची व्यवस्था करण्यात आलेली नाही.
दरम्यान, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून पाणीपुरवठ्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याने प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे. शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई असताना देखील प्रभावी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. विद्यमान आमदार आणि खासदार यांनीही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.