नांदेड, पुढारी वृत्तसेवा : एकट्या नांदेड शहरात तब्बल ९५ मिलीमीटर पाऊस झाला. तर नांदेड ग्रामीण, वसरणी, लिंबगाव व तरोडा या शहरी मंडळांसह जिल्ह्यातील एकूण १० मंडळात अतिवृष्टी झाली. परतीच्या पावसाने शेतीला मात्र मोठा तडाखा दिला. सोयाबीनची काढणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे, त्याचे नुकसान झाले. शिवाय केळी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. ( Nanded Rain )
बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनतर हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी जोरदार पाऊस झाला. सायंकाळपर्यंत पावसाची चिन्हं नव्हती. परंतु दिवस मावळल्यावर वातावरणात बदल झाला. रात्री नऊच्या सुमारास थंड व जोराने वारे वाहू लागले. त्यामुळे आभाळ निघून जाते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. परंतु रात्री ११ च्या सुमारास हलक्या पावसाला सुरुवात झाली. थोड्याच वेळा जोराचा पाऊस सुरु झाला. शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. बराच वेळ हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु होता.
मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमारास पुन्हा विजेच्या कडकडाटास सुरुवात झाली आणि पाठोपाठ जोरदार पाऊस सुरु झाला. मुसळधार स्वरुपाचा हा पाऊस तब्बल १ तासापेक्षा अधिक वेळ सुरु होता. याच पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. केळीची पाने फाटून गेली. पालेभाज्यांचा अक्षरशः चिखल झाला. फूलशेतीचे मोठे नुकसान झाले. रबीच्या हंगामाचा शेवट सुरु आहे. आता पर्यंत अनेक ठिकाणी सोयाबीनची काढणी पूर्ण झाली असली तरी बऱ्याचशा भागात अजून काम अर्धवट आहे. ( Nanded Rain )
सोयाबीन कापून शेतातच ढीग रचून ठेवण्यात आले आहे. त्याचे मोठे नुकसान झाले. कापणी न झालेले सोयाबीन हातचे गेल्यात जमा आहे. जेमतेम ८ ते ९ तासामध्ये नांदेड जिल्ह्यात ३३.१० मिलीमीटर पाऊस झाला. तर या पावसाळ्यात आजवर ९२३.९० मिलीमीटर पाऊस झाला असून आज रोजी पडलेल्या पावसाशी त्याची सरासरी टक्केवारी १०८.९३ एवढी आहे. तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १०३.६६ टक्के भरतो. आणखी दोन दिवस पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड शहर व परिसरात अतिवृष्टी झाली. शहरात अर्थात राज कॉर्नर ते जुने नांदेड या भागात तब्बल ९५.२५ मिलीमीटर पाऊस झाला. नांदेड ग्रामीण ७०.५० मि.मी., वसरणी ६९.७५, लिंबगाव ०१.७५, तरोडा ७७.५०, कुरुळा ७६, माळाकोळी ७९.७५, माहूर ७०.५०, गोलेगाव ७.२५ आणि अर्धापूर येथे ६८.२५ मिलीमीटर पाऊस झाला.