जालना, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या चोवीस तासांत सत्हा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जोरदार पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या सोयबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे काढणीस आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
जालना जिल्ह्यात जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात रिमझिम पावसावर खरिपाची पिके चांगलीच बहरली होती. यावर्षी चांगले उत्पन्न होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्याची अतिवृष्टीने निराशा केली आहे.
मंठा तालुक्यातील ढोकसाळ मंडळात ९३, बदनापूर तालुक्यातील दाभाडी ६८, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ६८ टेंभुर्णी ८० भोकरदन तालुक्यातील धावडा ७३, वाघुळ ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे शेतात काढून ठेवलेले सोयाबीन, मका, मूग, उडीद आदी पिकांमध्ये पाणी साचले. या पावसामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांतून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६०३ मि.मी. असताना आजपर्यंत जिल्हयात ८०१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या १३२ टक्के आहे. पावसामुळे मोसंबी, डाळिंबासह इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवार, शुक्रवार व शनिवारी जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात जालना ८२७, बदनापूर ७५२, भोकरदन ७५८, जाफराबाद ७४८, घनसावंगी ८६५, अंबड ६२५, परतूर ७५०, मंठा ६६८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत मागील चोवीस तासांत २४.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.