

Nanded Gorthekar brothers Umri Ajit Pawar's party
संजीव कुळकर्णी नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन वर्षांपूर्वी फूट पडल्यानंतर राजकीय सोयीनुसार 'या गटातून त्या गटात' संचार करणाऱ्या उमरी तालुक्यातील गोरठेकर बंधूंनी जिल्हा परिषद निवडणुका तसेच उमरी जीनिंगच्या जमीन विक्रीचे दीर्घकाळ रेंगाळलेले प्रकरण मार्गी लागण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात घुसखोरी करण्याचे ठरवले असून या घडामोडींमुळे स्थानिक पातळीवरील याच पक्षातला गट अस्वस्थ झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पवार यांचा पुढील आठवड्यातील नांदेड जिल्हा दौरा निश्चित झाला. त्यानुसार दिवाळी संपताच पक्षांतराचे फटाके फोडण्यासाठी ते गोरठा (ता. उमरी) आणि देगलूरला येणार आहेत. माजी आमदार दिवंगत बापूसाहेब गोरठेकर यांचे पुत्र शिरीष आणि कैलास तसेच त्यांचे समर्थक पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात आले.
उमरी तालुक्यात अजित पवारांच्या पक्षाची धुरा एक गट व्यवस्थित सांभाळत आहे. या गटाने मित्रपक्षाचे आमदार या नात्याने भाजपाच्या राजेश पवार यांच्याशी सलोखा निर्माण केला; पण आता राजकीय सोयीनुसार पक्षांतरे करणाऱ्या गोरठेकरांचे गाठोडे त्यांच्या डोक्यावर टाकण्याचे निश्चित झाले आहे. गोरठेकरांच्या या पक्षप्रवेशाची सारी सूत्रे आ.प्र.गो. पाटील चिखलीकर यांनी आपल्या हाती ठेविली आहेत.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात याच गोरठेकर बंधूंनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतला होता. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरस ठरला आणि सत्तेमध्येही आला. या पक्षातर्फे नांदेड जिल्ह्यातून चिखलीकर आमदार झाले.
तेव्हापासून थोरल्या पवारांच्या पक्षातच राहिलेल्या गोरठेकर बंधूंनी जि.प. निवडणुका समोर येताच पुन्हा अजितदादांच्या पक्षात उडी मारण्याचे ठरवले असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम २५ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची चर्चा उमरीच्या राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळाली. पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने या माहितीला दुजोरा दिला.
उमरी तालुक्यात मागील ८ वर्षांपासून उमरी जीनिंग-प्रेसिंग संस्थेचे जमीन विक्री प्रकरण सुरू आहे. गोरठेकरांच्या ताब्यातील या संस्थेची काही जमीन आधुनिकीकरणाच्या नावाखाली विक्री करण्याचा घाट घालण्यात आला होता. बापूसाहेब गोरठेकर यांना आपल्या हयातीत हे प्रकरण पूर्णपणे धसास लावता आले नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या राजकीय वारसदारांनी राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या माध्यमातून जमीन विक्री प्रकरण तडीस नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. मधल्या काळात सहकारमंत्र्यांनी त्यांना अनुकूल असा निर्णय दिला; पण संस्थेच्या काही जागरुक हितचिंतकांनी त्याविरुद्ध आपला लढा जारी ठेवला आहे. अजित पवार यांना हे प्रकरण ठाऊक नसल्याचे सांगण्यात आले.