

Leaders Visit Ganesh Mandal Political Campaign Ganesh Festival
नांदेड- सर्वच पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागले आहेत. मतांची बेगमी करण्यासाठी आपापल्या मतदारसंघातील विविध गणेश मंडळांना भेटीगाठीचे सत्र सुरू झाल्याचे पहायला मिळते. जिल्ह्याचे पुढारी जिल्हा पिंजून काढत आहेत. दरम्यान, पूर परिस्थितीत लोकांना आपापल्यापरीने मदत करण्यातही स्थानिक पुढारी अग्रेसर दिसून आले.
ऑगस्ट महिना संपला. सोमवारी (दि. १ सप्टेंबर) ज्येष्ठा गौरीच्या पूजनाने सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर निवडणुका केव्हाही लागू शकतात, हे गृहित धरून राजकीय क्षेत्रेताली मंडळी कामाला लागली आहे. ऑक्टोवर नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील, असे मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेतेमंडळी वारंवार भाषणातून सांगतात. त्यानुसार आपापल्या पक्षाच्या कार्यकत्यांना कामाला लागण्याचे संदेश सुद्धा दिले गेले आहेत. कायम निवडणूक मानसिकतेत असणाऱ्या भाजपाने विविध पातळीवर तयारी सुरू सुद्धा केली आहे. या तुलनेत काँग्रेस बरीचशी मागे दिसून येते.
भाजपा महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी गणेश मंडळ देखावे स्पर्धा आयोजित केली आहे. त्यानिमित्त परीक्षणासाठी सुद्धा भाजपा पदाधिकारी असंख्य मंडळांना भेटी देतील. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण पूरग्रस्तांसह गणेश मंडळांनासुद्धा भेटी देत आहेत. आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे सुद्धा विविध ठिकाणी भेटी देऊन लोकांच्या सुखदुःखात सहभागी होताना दिसतात. मागील सुमारे सात वर्ष कोणत्याही पदावर नसलेले माजी स्थानिक लोकप्रतिनिधी आपापल्या भागात अहोरात्र फिरून जनसंपर्क वाढवत आहेत.
सोमवारी ज्येष्ठा गौरीचे पूजन झाल्यानंतर आणि पावसाने विश्रांती घेतली तर मंगळवारपासून लोक सहकुटुंब विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी व दर्शनासाठी उशिरापर्यंत बाहेर गर्दी करतील. यंदा संततधार पावसाने गणेश भक्तांसमोर अनंत अडचणी निर्माण केल्या. बहुतांश मंडळांनी नेहमीप्रमाणे अवाढव्य मूर्ती बनविण्यावर भर दिला. काही मोजक्या मंडळांनी परंपरा जपत विविध प्रकारचे देखावे तयार केले आहेत. पोलिस बांधव सतत कर्तव्यावर असून रात्री विशेष दक्षता घेतली जाताना दिसते. दि. ६ रोजी शनिवारी अनंत चतुर्दशी असल्याने येत्या चार दिवसांत बाजारात रात्री उशिरापर्यंत गर्दी असेल.