One died due to shock while putting up the Ganeshotsav banner; 6 people injured
गणेशोत्सव सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून इंजिनिअर तरूणाचा मृत्यू, ६ जखमीFile Photo

गणेशोत्सव सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून इंजिनिअर तरूणाचा मृत्यू, ६ जखमी

Kolhapur News : गारगाेटी शिवाजीनगर येथील घटना
Published on

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा

येथील शिवाजीनगर मधील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेशाच्या आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावत होते. यावेळी विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला फलकाच्या लोखंडी फ्रेमचा स्पर्श झाल्याने विजेचा शॉक लागून अरूण रमेश वडर (वय २२) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सहाजण जखमी झाले. यातील तिन जणांवर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात तर एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अरूण वडर याच्या मृत्यूने संपूर्ण गारगोटी नगरीवर शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजी नगर गारगोटी येथील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते फलक लावत होते. यावेळी फलक लावलेल्या बांबूला शिडी लावली होती. फलक बांधून एकजण खाली उतरत असताना फलकाचा बांबू कोलमडून फलक तारेवर पडला. विद्युत प्रवाह फलकाच्या लोखंडी फ्रेम मधून लोखंडी शिडीत उतरला. शिडी धरलेला अरूण गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. फलकाला धरलेल्‍या इतर सहा जणांना शॉक लागून ते बाहेर फेकले गेले. अविनाश भोपळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.

खासगी रुग्णालयात त्वरित उपचार झाल्याने भोपळे यांचा जीव वाचला. तर यश तानाजी शालबिद्रे, अविनाश कृष्णा भोपळे, अमोल विलास सुतार, श्रीधर वडर यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमेश प्रकाश शेटके, रोहन रामचंद्र कोरवी यांच्यावर गारगोटी रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जुन आबीटकर, बाजार समितीचे संचालक शेखर देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, ग्रा. प. सदस्य भरत शेटके यांनी तातडीने जखमींना उपचारासाठी गारगोटी रूग्णालयात दाखल केले. मृत अरूणने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्यावर काळाने झडप घातल्याने वडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news