Nanded Drought : सणावर दुष्काळाचे सावट; गोरगरिबांची दिवाळी संकटात !

आर्थिक अडचणी, पावसाअभावी शेतीचे नुकसान आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांची दिवाळी यंदा फिकी पडण्याची चिन्हे
Nanded Drought
Nanded Drought : सणावर दुष्काळाचे सावट; गोरगरिबांची दिवाळी संकटात !file photo
Published on: 
Updated on: 

Nanded Drought : Drought on festival; Diwali of the poor in crisis!

अहमद शेख

लोहा : दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, रोषणाई, फराळ, नवीन कपडे आणि घराघरांत आनंदाचे वातावरण असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र यंदा दुष्काळाच्या सावटामुळे ग्रामीण भागातील दिवाळीचा उत्साह कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी गोरगरीब कुटुंबांसाठी आनंदापेक्षा चिंतेची ठरत आहे.

Nanded Drought
Nanded News : नांदेडसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभारणार! : जिल्हाधिकारी

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी पिके करपली, तर काही ठिकाणी अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा मावळली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या हातात पैसा नसल्याने दिवाळीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेल, साखर, डाळी, किराणा साहित्य, कपडे आणि फराळाच्या साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. आधीच उत्पन्नाचे साधन कमी आणि त्यात वाढती महागाई यामुळे दिवाळीचा सण साजरा करणे अनेक कुटुंबांना कठीण झाले आहे.

दिवाळीनिमित्त मुलांना नवीन कपडे घेणे, घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे, फराळ तयार करणे आणि नातेवाईकांसोबत सणाचा आनंद लुटणे ही प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते. मात्र हाताला काम नाही, शेतात उत्पन्न नाही आणि घरात आर्थिक चणचण असल्याने अनेक पालकांना मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा देखील पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावरील दिवाळीचा आनंदही काहीसा हरवल्याचे चित्र आहे.

Nanded Drought
Women protest : गोंधनखेड्यात महिलांचे पाण्यासाठी आंदोलन

ग्रामीण भागातील शेतमजुरांची परिस्थिती तर अधिकच बिकट झाली आहे. पावसाअभावी शेतीची कामे कमी झाल्याने मजुरांच्या हाताला पुरेसे काम मिळत नाही. रोजगार नसल्याने रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत दिवाळीचा अतिरिक्त खर्च करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

शासनाकडून मदतीची अपेक्षा

दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत, रोजगार हमीची कामे, जनावरांसाठी चारा आणि आवश्यक त्या शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एकीकडे दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याची परंपरा आहे, तर दुसरीकडे दुष्काळ आणि महागाईमुळे अनेक घरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. श्रीमंतांच्या घरात रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना गरीबांच्या घरात मात्र आर्थिक विवंचनेचा अंधार दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.