

A people's movement for water conservation will be launched in Nanded! : District Collector
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. श्रमदानातून जलसंधारणाची कामे हाती घेऊन ही चळवळ गावागावांत रुजवावी. दुष्काळमुक्त नांदेडचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकसहभागातून व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७च्या अनुषंगाने जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणे आणि विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, विभागीय वन अधिकारी मनीषा पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या गावांना प्राधान्य द्या
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तालुक्याने दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या गावांची यादी तयार करावी. या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक गावातील पाच ते सहा व्यक्तींची निवड करून त्यांची नावे प्राधान्याने सादर करावीत.
वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक गावातील जलसंधारणाच्या कामात पुढाकार घेऊ शकणाऱ्या व्यक्तींची निवड करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. ही केवळ जलसंधारणाची मोहीम नसून लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी चळवळ आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या संधीचे सकारात्मक कामात रूपांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जलसंधारणाला बळ
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येणारी 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धा ही जलसंधारण व पाणलोट व्यवस्थापनावर आधारित महत्त्वपूर्ण मोहीम आहे. या माध्यमातून गावागावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पाणी व्यवस्थापनाबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे. पाणी फाउंडेशन गेल्या दहा वर्षांपासून पाणी व शेती या विषयांवर ग्रामीण भागात प्रशिक्षण, जनजागृती आणि लोकसहभागातून विविध उपक्रम राबवित आहे.