

मुदखेड : मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून चार गायी दोन वासरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.७) रात्री ८.३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुदखेड तालुक्यात रविवारी रात्री विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यादरम्यान मौजे डोंगरगाव येथील शेतकरी दिलीप दामोदर पाटील-व्यवहारे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत चार गायी व दोन वासरांसह संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या घटनेनंतर बारड परिसरातील अनेक पक्षाचे पदाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शेतकरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना देण्यात आलेली असून उद्या घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.