

Nanded District Central Cooperative Bank
विशेष प्रतिनिधी
नांदेड : सार्वजनिक जीवनात जबाबदारीचे पद धारण करणारांनी पारदर्शकता आणि सचोटी राखणे अपेक्षित असले, तरी नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतिनिधी राजेश्वर ऊर्फ राजेश पावडे यांनी सचोटीशी आपले 'वावडे' असल्याचे दाखवून देत बँकेच्या एका शाखाधिकाऱ्यास गोत्यात आणले आहे.
राजेश पावडे यांनी काही महिन्यांपूर्वी बँकेच्या एका शाखेत केलेला 'प्रताप' जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापुढे अद्याप आलेला नाही; पण त्यासंदर्भात तक्रारकत्यनि बँकेच्या अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीची प्रत, गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना पावडे यांनी त्यासोबत जोडलेले शपथपत्र आणि इतर कागदपत्रे तपासल्यानंतर पावडे यांची भानगड समोर आली.
नांदेड तालुक्यातील एकदरा येथील कपिल गुलाबराव भोजने हे या प्रकरणातील तक्रारकर्ते असून राजेश्वर पावडे यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या नवा माँढा शाखेच्या शाखाधिकाऱ्यास हाताशी धरून केलेली लबाडी भोजने यांनी काही महिन्यांपूर्वी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या लेखी तक्रारीवरून तसेच सहकार खात्याच्या आदेशानुसार बँकेने संपूर्ण चौकशी केली; पण या प्रकरणी अंतिम कारवाई अद्याप झालेली नाही. बँकेने जिल्हा उपनिबंधकांना या प्रकरणी नुकतेच एक पत्र पाठवल्याचे दिसून आले.
राजेश्वर पावडे यांचे निवडणूक अर्जासोबतचे शपथपत्र तपासले असता, आलेगाव परिसरातील एकदरा येथे त्यांची शेतजमीन असल्याचे दिसून येत नाही; पण त्यांनी जिल्हा बँकेच्या नवा मोंढा शाखेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून आ लेगाव गट क्र. ४८च्या ७/१२ उताऱ्यावर आपल्यावरील कर्जाचा (रक्कम १ लाख ६० हजार) बोजा लावून घेतला आहे. संबंधित शाखाधिकाऱ्याने गेल्या ८ एप्रिल २०२५ रोजी आलेगाव तलाठी कार्यालयास एकाच दिवशी तीन वेगवेगळी पत्रे दिली. पहिल्या पत्रात २५ हजारांच्या कर्जाचा, तर तिसऱ्या पत्रात १ लाख ६० हजारांच्या कर्जाचा उल्लेख आहे तर दुसऱ्या पत्रामध्ये आकड्यांमध्ये खाडाखोड दिसून येते.
वरील कर्जाची नोंद करण्यात यावी, असे बँकेच्या नवा मोंढा शाखेच्या अधिकाऱ्याकडून तलाठी कार्यालयास कळविण्यात आले. पण त्यावेळी बँकेने पावडे यांचे लेखी पत्र तसेच आलेगावच्या जमिनीशी कागदपत्रे त्यांच्याकडून घेतली होती का, याचा उलगडा प्राथमिक चौकशीतून झालेला नाही. आलेगावच्या जमिनीवर दीड लाखांहून अधिक कर्जाचा बोजा चढविण्याचा खटाटोप कशासाठी केला गेला, ते कळाले नाही, पण वरील जमिनीवरून तक्रारकर्ते भोजने आणि पावडे यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असल्याचे सांगण्यात आले.
राजेश्वर पावडे यांची शेतजमीन वाडी (बु.) येथील वेगवेगळ्या गटांमध्ये असून गट क्र. १८८ मधील जमिनीवर त्यांना देण्यात आलेल्या कर्जाची नोंद झालेली आहे. वाडी (बु.) हे गाव जिल्हा बँकेच्या नवा मोंढा शाखेच्या कार्यक्षेत्रात मोडते; पण आलेगाव शिवारातील शेतजमिनी नवा मोंढा शाखेच्या कार्यक्षेत्रात येत नसतानाही पावडे यांच्याकडील १ लाख ६० हजारांच्या कर्जाचा बोजा वरील शाखेमार्फत चढविण्यात आला. ही बाब उघड झाल्यानंतर संबंधित शाखाधिकारी गोत्यात आले आहेत.
कपिल भोजने यांच्या तक्रारीनुसार बँकेच्या शेती विभागप्रमुखाने ऑगस्ट महिन्यात संपूर्ण चौकशी केली. त्यातून वस्तुस्थिती समोर आली. राजेश्वर पावडे यांना वाडी (बु.) सेवा सहकारी सोसायटी मार्फत कर्ज वाटप करताना आलेगाव शिवारातील त्यांच्या जमिनीवर कर्ज बाकीची रक्कम कमी असतानाही १ लाख ६० हजारांचा बोजा चढवणे हे कृत्य चुकीचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आलेगाव सोसायटी बँकेच्या श्रीनगर शाखेस संलग्न आहे, याकडेही चौकशी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. बँकेच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवारी होत आहे. त्या आधीच पावडे यांचे हे प्रकरण बाहेर आले आहे.
वरील प्रकरणात जिल्हा बँकेच्या शेती कर्ज विभागाकडून जिल्हा उपनिबंधकांस नुकतेच एक पत्र पाठविण्यात आले आहे. नवामोंढा शाखेचे शाखाधिकारी टी. एस. भोसले यांना प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांचा खुलासा मागविण्यात आला. पण त्यांच्याकडून अद्याप खुलासा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरील पुढील कार्यवाहीची टिप्पणी वरिष्ठांकडे सादर केली जाणार असल्याचे वरील पत्रात नमूद करण्यात आले आहे. भोसले यांना आता खातेअंतर्गत चौकशीला सामोर जावे लागणार, असे दिसते.