

बाळासाहेब पांडे
नायगाव : शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत पोलीस यंत्रणेलाच खुले आव्हान दिल्याचे चित्र समोर आले आहे. पोलीस ठाण्याच्या जवळच अंतरावर असलेल्या तब्बल पाच दुकानांचे शटर फोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवार, रविवारच्या मध्य रात्री हात साफ केल्याने शहरातखळबळ उडाली आहे.
भर वस्तीत, मध्यवर्ती भागात आणि पोलीस ठाण्याच्या अत्यंत जवळच ही चोरीची मालिका घडली आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला असून नायगावातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांना लक्ष्य केले. शटर उचकटून दुकानांत प्रवेश करत रोकड, मौल्यवान साहित्य आणि विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंवर डल्ला मारण्यात आला. सकाळी दुकानदार दुकाने उघडण्यासाठी आले असता शटर तुटलेली, साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आणि चोरी झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे ज्या भागात ही चोरी झाली तो परिसर पोलीस ठाण्याच्या अगदी जवळचा असल्याने चोरट्यांनी थेट पोलिसांनाच थेट आव्हान दिल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. सलग पाच दुकाने फोडली जात असताना रात्रीची पोलीस गस्त नेमकी कुठे होती, असा संतप्त सवाल व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. शहराच्या मध्यभागीच चोरट्यांनी एवढ्या मोठ्या धाडसाने हात साफ केल्याने व्यापारी, नागरिक आणि रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नायगावातील व्यापारी वर्गाने पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करून शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
व्यापाऱ्यांचा संताप; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलीस ठाण्याच्या जवळच एक-दोन नव्हे तर थेट पाच दुकाने फोडली जाणे ही नायगावच्या सुरक्षाव्यवस्थेची लाजिरवाणी बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून उमटत आहे. “चोरट्यांना जर पोलीस ठाण्याजवळच भीती उरली नसेल, तर सामान्य व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची?” असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह
भरवस्तीत सलग पाच दुकाने फोडण्याइतका वेळ चोरट्यांना मिळतोच कसा, यावरून रात्रीच्या पोलीस गस्तीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ आणि संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त अधिक कडक करावी, सीसीटीव्ही नेटवर्क मजबूत करावे आणि संशयितांवर करडी नजर ठेवावी, अशी मागणी पुढे येत आहे.