

नायगाव : नायगाव शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि दुकानफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. मात्र, नायगाव पोलिस विभाग अजूनही एकाही चोरीचा उलगडा करण्यात अपयशी ठरला आहे. पोलिस निरीक्षकांकडून या घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शनिवारी रात्री ब्लू बेल्स इंग्लिश स्कूलजवळील विश्वकर्मा नगर भागात कपनीत काम करणारे भुजंग मीरकुठे यांच्या घरात आणि शेजारच्या दुकानात चोरट्यांनी धाड घातली. मीरकुठे हे मेव्हण्याच्या निधनामुळे बाहेरगावी गेले असताना, चोरट्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत घर फोडून दागिने आणि दुकानातून रोख रक्कम मिळून सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, पावती नसल्याने तीन तोळे सोने चोरीला गेल्याचे असूनही पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही, अशी माहिती मीरकुठे यांनी दिली. मात्र, त्यांच्या पत्नीचे चार तोळ्यांचे दागिने दुसरीकडे ठेवले असल्याने ते वाचले. अखेर शनिवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
मीरकुठे यांच्या मते, चार ते पाच लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत. पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले, मात्र नेहमीप्रमाणे कोणताही ठोस सुगावा लागला नाही. या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाविषयी नाराजी वाढली आहे.
यात आणखी चिंतेची बाब म्हणजे, नायगावचे पोलीस जमादार सांगवीकर हे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करून अवैध मार्गाने संपत्ती मिळविण्यात गुंतले असल्याची चर्चा आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी नेमलेले अधिकारीच व्यक्तिगत फायद्यासाठी कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
घटनेची माहिती कळताच पोलिस यंत्रणा तत्काळ मदती साठी गेली डॉग, ठसे वाले बोलावले पण मिरकुटे यांचे दागिने घरात दुसरीकडे सापडले किरकोळ दागिने गेल्याने ते फिर्याद द्यायला तयार नव्हते पण आम्ही फिर्याद द्या म्हणून सांगून गुन्हा दाखल केला.
पोलिस निरीक्षक एस. मारकड