

Marital Dispute Biloli Argapur
कुंडलवाडी : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथे घडली आहे. आनंदा हणमंतराव जाधव (वय ४०) असे मृत पतीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी पत्नी राजश्री आनंदा जाधव (वय ३३) आणि तिचा प्रियकर शंकर लिंगप्पा पांचाळ (वय ५२, दोघेही रा. अर्जापूर, ता. बिलोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा जाधव हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नीचे गावातीलच शंकर पांचाळ याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. आनंदा यांनी पत्नीला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र वाद वाढतच गेले. अखेर, २० जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आनंदा यांनी स्वतःला पेटवून घेतले. गंभीर भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना समजताच कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी राजश्री आणि तिचा प्रियकर शंकर पांचाळ यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.