

नायगाव : नायगाव तालुक्यातील नरसी येथील बसस्थानकासमोरील आशीर्वाद व आनंद लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापारावर नांदेड पोलिसांनी शनिवारी (दि. २५) नियोजनबद्ध कारवाई करत मोठा भांडाफोड केला. स्थानिक गुन्हे शाखा, रामतीर्थ पोलीस ठाणे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या संयुक्त पथकाने एकाचवेळी टाकलेल्या धाडीत ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी लॉज मालकासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी दिल्यानंतर ही धडक मोहीम राबविण्यात आली. बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगांवकर यांच्या नेतृत्वाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी स्थानिक माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, या दोन्ही लॉजमध्ये महाराष्ट्रासह परराज्यातील महिलांना आणून त्यांच्याकडून कथितरीत्या देहव्यापार करून घेतला जात होता. माहितीची शहानिशा करण्यासाठी दोन जणांना बोगस ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्याचा इशारा मिळताच पोलिसांच्या पथकाने दोन्ही लॉजवर एकाचवेळी धाड टाकून संबंधितांना ताब्यात घेतले.
या कारवाईत राहुल यशवंता कोलते, विश्वंभर व्यंकटी गाडे, बालाजी आनंदा सूर्यवंशी, खाकीबा शिवाजी सूर्यवंशी, लॉज मालक पांडुरंग शिवराम श्रीरंगिरे, नरसिंग बाबुसिंग ठाकूर ऊर्फ परदेशी, प्रवीण दत्तू वारनलवार, कृष्णा बालाजी देशपिठवार, व्यंकट माधव नारे आणि विक्की विनोद इंदुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नांदेड जिल्हा व पश्चिम बंगाल येथील सात महिलांची सुटका करून त्यांना संरक्षण व पुनर्वसनासाठी संबंधित यंत्रणेकडे सोपविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ६ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम १४३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास रामतीर्थ पोलीस करीत आहेत.
या धडक कारवाईमुळे नरसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कथित अवैध धंद्यांविरोधात पोलीस प्रशासनाने 'झिरो टॉलरन्स'ची भूमिका स्वीकारल्याचा ठोस संदेश या कारवाईतून गेला आहे.