

राजेंद्र कांबळे
बिलोली ः उन्हाळ्याच्या कडाक्यात होरपळणाऱ्या नांदेड शहरात ‘निसर्ग आधारित उपायांनी’ गारवा आणला आहे. बिलोली तालुक्यातील संस्कृती संवर्धन मंडळ (सगरोळी), प्रॅक्टीकल ॲक्शन आणि अखिल भारतीय आपत्ती निवारण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘कूल रूफिंग’ उपक्रमामुळे घरांच्या तापमानात तब्बल 7 ते 8 अंशांची घट झाली आहे. या अभिनव प्रयोगाचा फायदा शहरातील 100 गरजू कुटुंबे आणि लघु व्यावसायिकांना मिळत आहे.
शहरातील झोपडपट्टी आणि कमी उंचीच्या घरांवर सूर्याची किरणे थेट पडल्याने पत्रे किंवा सिमेंटची धाबे प्रचंड तापतात. यावर उपाय म्हणून या उपक्रमांतर्गत छतावर विशेष ‘रिफ्लेक्टिव्ह’ (परावर्तक) लेप किंवा पांढऱ्या रंगाचे कोटिंग करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान सूर्याची उष्णता शोषून घेण्याऐवजी ती परावर्तीत करते. परिणामी, घराच्या आतील तापमान बाहेरील तापमानापेक्षा लक्षणीयरीत्या कमी राहते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज विष्णुनगर परिसरातील लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्याचा गौरव केला.
या योजनेचा थेट लाभ हातावर पोट असलेल्या कुटुंबांना आणि छोट्या व्यावसायिकांना होणार आहे. दरम्यान, आरोग्यात सुधार, घरातील उकाडा कमी झाल्याने लहान मुले आणि वृद्धांना उष्माघातापासून संरक्षण मिळाले आहे. घरून काम करणाऱ्या लघु व्यावसायिकांना ज्यामध्ये शिलाई काम, घरगुती उद्योग आता दुपारीही काम करणे शक्य झाले आहे.
उकाड्यामुळे होणारा थकवा कमी झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेत आणि पर्यायाने उत्पन्नात सकारात्मक बदल झाला आहे. पंख्याचा वापर कमी झाल्याने वीज बिलातही बचत होत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी संस्कृती संवर्धन मंडळाचे संचालक रोहित देशमुख, कार्यक्रम व्यवस्थापक सर्जेराव ढवळे, प्रसिद्धी व्यवस्थापक सचिन येरमाळकर उपस्थित होते. तांत्रिक बाजू मांडण्यासाठी समन्वयक अरुंधती स्वामी, शुभांगी जल्लेवार, सुभाष वाघमारे आणि चक्रधर पुयड यांनी सहकार्य केले. नांदेडमधील हा प्रयोग केवळ एका शहरापुरता मर्यादित न राहता, वाढत्या जागतिक तापमानाला तोंड देण्यासाठी इतर शहरांसाठीही एक ‘रोडमॅप’ ठरू शकतो.