Nanded Calligrapher Award | सुलेखनकार राम कस्तुरे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार; मराठवाड्यातील भुमिपुत्राचा दक्षिण कोरियात गौरव

पुरस्कारप्राप्त कलाकृती भारतीय भाषेतील देवनागरी लिपीवर आधारित
Nanded Calligrapher Ram Kasture
Ram KasturePudhari
Published on
Updated on

Nanded Calligrapher Ram Kasture

सेलू : नांदेड येथील सुपुत्र तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार राम कस्तुरे यांना नुकताच जागतिक पातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कलाकृतीला ‘जागतिक स्तरावरील उत्कृष्ट कलाकृती’ म्हणून गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारप्राप्त कलाकृती भारतीय भाषेतील देवनागरी लिपीवर आधारित आहेत.

दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या जागतिक सुलेखन प्रदर्शनात कस्तुरे यांच्या दोन कलाकृती प्रदर्शित झाल्या होत्या. रसिकांनी आणि समीक्षकांनी या दोन्ही कलाकृतींचे भरभरून कौतुक केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय निवड समितीने त्यांची पुरस्कारासाठी अधिकृत निवड केली आहे.

येत्या ४, ५ आणि ६ सप्टेंबर रोजी दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या भव्य महोत्सवात हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी राम कस्तुरे दक्षिण कोरियाकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या यशाबद्दल भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कला विश्वातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Nanded Calligrapher Ram Kasture
Nanded News | नालीच्या ‘एमबी’साठी सरपंचाचा जीवन संपविण्याचा प्रयत्न; किनवट पंचायत समिती आवारात खळबळ

कॅलिग्राफी..?

सुलेखन म्हणजे अक्षरांना सुंदर, सुबक आणि कलात्मक पद्धतीने सादर करण्याची दृश्यकला. इंग्रजीत तिला ‘कॅलिग्राफी’ म्हणतात. यात विशिष्ट बोरू, खास नीब असलेले पेन, शाईचे ब्रश आणि विविध रंगांच्या सहाय्याने अक्षरांना प्रमाणबद्ध वळण देऊन त्यांचे सौंदर्य खुलवले जाते.

मराठवाड्यातील भूमिपुत्र

मूळचे नांदेडचे असलेले राम कस्तुरे हे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

वेदशास्त्रसंपन्न स्वर्गीय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांचे ते नातू आहेत. ‘वेदाक्षरे’ हा त्यांच्या सुलेखनाचा जिव्हाळ्याचा विषय असून, त्यासाठी त्यांनी कलासाधनेसोबतच वेदांचे सखोल अध्ययनही केले आहे.त्यांनी मुंबई (डोंबिवली) येथे एक मोठी गॅलरी उघडली आहे. तेथे अविरतपणे हे कार्य सुरू आहे.

माजी पंतप्रधानांनी केले कौतुक

राम कस्तुरे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे सुलेखन करून तो काव्यसंग्रह पुस्तकरूपात प्रकाशित केला होता. या कार्याची दखल घेत तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवींसिंग शेखावत आणि तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता.

Nanded Calligrapher Ram Kasture
Nanded illegal sand mining : अवैध वाळू उपशावर डीआयजींच्या पथकाचा सर्जिकल स्ट्राईक

यापूर्वी त्यांना स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नामांकित कला दालनांमध्ये तब्बल बारा वेळा त्यांच्या कलाकृतींचे स्वतंत्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. दोन वेळा त्यांनी आंतरराष्ट्रीय सुलेखन प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. नुकतेच त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये ‘वेदाक्षरे’ हे विशेष कला दालन सुरू केले आहे.

अनेक चित्रपट आणि मालिकांच्या शीर्षकांचे अक्षरलेखनही त्यांनी केले आहे. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांकडे त्यांच्या कलाकृती संग्रहित आहेत. २०१६ च्या जगतसुंदरी स्पर्धेत प्रियांका खुराना हिच्या पोशाखावर कस्तुरे यांनी साकारलेले सुलेखन विशेष गाजले होते आणि त्या स्पर्धेत प्रियांका विजेती ठरली होती. सौंदर्य स्पर्धेच्या इतिहासातील हा पहिला आणि यशस्वी नाविन्यपूर्ण प्रयोग ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news