

नांदेड : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात भाग्यनगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला (डीबी) मोठे यश आले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तीन सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ४ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना, शाहू महाराज पुतळा परिसरात काही संशयित तरुण फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने दिली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत विशाल सुनील कऱ्हाळे (वय २५, रा. नारायणनगर), सुगंध संजय पाईकराव (वय २२, रा. तेहरानगर) आणि मगद मुकुंदराव वाघमारे (वय २५, रा. वामनदादा कर्डकनगर) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने व मोठी रोकड आढळली. या मालाबाबत त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने पोलिसांनी सुरुवातीला महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये कारवाई केली.
संशयितांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नारायणनगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड तपासले असता, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या घरफोडीचा गुन्हा (क्र. २९१/२०२६) दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून २ लाख १० हजार रुपयांची रोकड, ५१ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने (४ ग्रॅम), ३ हजार १०० रुपयांचे चांदीचे दागिने (२१ ग्रॅम) आणि दीड लाख रुपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष तांबे, महेश माळी, पोउपनि विनोद देशमुख, नरेश वाडेवाले आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.