

मुखेड: मुखेड तालुक्यातील बापशेटवाडी येथील संभाजी पाटील हा तरुण तब्बल १४ वर्षांनंतर आपल्या गावी परतल्याने नातलगांसह गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सन २०१२ मध्ये उदगीर येथून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या नातलगांनी उदगीर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.
दीर्घ कालावधीनंतर संभाजी अनिल पाटील हे सुखरूपपणे आपल्या गावी परतल्याची माहिती मिळताच नातलग व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. गावात परतल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. तसेच या प्रकरणात सहकार्य करणाऱ्या उदगीर पोलीस ठाण्यातही संभाजी दत्तक पिता अनिल पाटील यांचा सन्मान करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संभाजी पाटील यांचे दत्तक वडील अनिल पाटील हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार, संभाजी पाटील यांना अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या नातलगांसह बापशेटवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संभाजी अनिल पाटील पुन्हा गावी परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.