

Nanded Bank Annual Meeting Job Recruitment
विशेष प्रतिनिधी नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी (दि.३०) होणार असून या सभेमध्ये प्रस्तावित नोकरभरतीचा विषय गाजण्याची शक्यता आहे.
बँकेच्या ६२ शाखा कार्यरत असून बँक मुख्यालयासह सर्वच शाखांमध्ये अपुरे कर्मचारी असल्यामुळे दैनंदिन व्यवहारात अडचणी निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी सहकार आयुक्तांनी अधिकारी आणि कर्मचारी मिळून १५६ जागा भरण्यास परवानगी दिली.
बँक प्रशासनाकडून आवश्यक ती प्रक्रिया सुरू असतानाच बँकेच्या एका बड्या आणि इतर काही संचालकांनी नोकरभरतीत हिस्सेदाराचा बाजार मांडल्याची बाब गेल्या आठवड्यात जिल्हाभर गाजली. येथे चाललेल्या या हिणकस प्रकाराची मुख्यमंत्री कार्यालयाने नोंद घेतल्यानंतर हिस्सेदारीत मोठा वाटा घेऊ पाहणारा संचालक या विषयात एकदम 'मौनी बाबा' झाल्याचे दिसून आले. गेल्या आठ दिवसांत या आणि इतरांनीही नोकरभरतीला 'न' देखील उच्चारला नाही.
कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्याकरिता त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यापूर्वी बँकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेची जिल्हा उप निबंधकांनी सविस्तर माहितीही घेऊन आपला अहवाल सहनिबंधक कार्यालयाकडे पाठविला. त्या अहवालावर सहनिबंधक आपला अभिप्राय वरिष्ठांना कळविणार आहेत. एकंदर परिस्थिती पाहता बँकेने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्दबातल होण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींनंतर बँकेच्या वार्षिक सभेची तारीख नजीक येऊन ठेपली आहे. या सभेसमोर नोकरभरतीचा विषय सूचीवर असला, तरी प्रत्यक्ष प्रक्रिया होण्यापूर्वीच नोकरभरतीत संचालकांचा हस्तक्षेप होणार असल्याची बाब उघड झाल्यामुळे काही जागरुक सभासद वरील सभेत नोकरभरतीचा विषय उपस्थित करणार असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्रात काही जिल्हा बँकांमध्ये नोकरभरतीची परीक्षा आणि उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांतील गैरप्रकारांची चौकशी झाली. पण नांदेड बँकेत निविदा प्रक्रियेतील गडबडीची चौकशी झाल्यामुळे वरच्या पातळीवर या बँकेची प्रतिमा मलिन झाली आहे.