Nanded|५० लाखांची नवी इमारत, पण पाण्याचा एक थेंब नाही! नांदेडच्या आदमपूर आरोग्य उपकेंद्रात रुग्णांचे अतोनात हाल

५० लाखांची नवी इमारत, पण पाण्याचा एक थेंब नाही! नांदेडच्या आदमपूर आरोग्य उपकेंद्रात रुग्णांचे अतोनात हाल
Nanded news
Nanded news pudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड : बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मागील सात महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जवळपास ५० लाख रुपये खर्च करून भव्य इमारत उभी करण्यात आली, मात्र, त्यात पाण्याची कोणतीही शाश्वत सोय न केल्यामुळे गरोदर माता, अपंग रुग्ण, महिला आणि पुरुषांना उपचारासाठी आल्यावर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या अनास्थेमुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nanded news
Nanded Crime : विसर्जन मिरवणुकीत गुलाल उधळण्यावरून वाद

पाण्याविना शौचालये

पायाभूत सुविधांचा अभाव:शासनाने अंदाजे ५० लाख रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्राची मोठी व देखणी इमारत बांधली; परंतु इमारतीमध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. इमारतीमध्ये रुग्णांसाठी शौचालय व बाथरुम उपलब्ध आहेत, पण पाण्याचा एक थेंबही नसल्यामुळे ते कुचकामी ठरले आहेत. याचा सर्वाधिक त्रास गरोदर महिला, वृद्ध, बालके आणि अपंग रुग्णांना होत आहे. उपकेंद्राच्या परिसरात बोरवेल उपलब्ध असूनही ते दुर्लक्षित आहे. संबंधित ठेकेदाराने केवळ ३०० लिटरची जुनी पाण्याची टाकी बसवून औपचारिकता पूर्ण केली आहे, जी अपुरी ठरत आहे.

Nanded news
Painganga Wildlife Sanctuary | पैनगंगा अभयारण्यात जंगलसफारी सुरू करा, खरबीसोबत मन्याळी गेटही खुले करण्याची मागणी

इलेक्ट्रॉनिक साहित्य बंद आणि कर्मचाऱ्यांची वाणवा

आरोग्य उपकेंद्रात डिजिटल नोंदीसाठी कॉम्प्युटर, बॅटरी, प्रिंटर आणि इन्व्हर्टर अशी यंत्रसामग्री उपलब्ध आहे; मात्र देखभालीअभावी ही सर्व उपकरणे सध्या पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. या आरोग्य केंद्रात एकूण ४ पदे मंजूर असताना सद्यस्थितीत केवळ ३ पदे भरलेली आहेत. यामध्ये १ सी.एच.ओ. (CHO), २ ए.एन.एम. (ANM) आणि १ पी.ओ. अशी पदे आहेत, तर 'एमपीडब्ल्यू' (MPW) चे एक महत्त्वपूर्ण पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. हे पद लवकर भरण्याची मागणी होत आहे. येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची (निवास) कोणतीही व्यवस्था उपकेंद्राच्या आवारात नाही.

आरोग्य उपकेंद्रातील पिण्याच्या व सांडपाण्याच्या पाण्याचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी येथील कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे दोन ते तीन वेळा लेखी निवेदन व अर्ज दिले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीकडून या महत्त्वाच्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने आता जिल्हा प्रशासनानेच यात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे. तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून आदमपूर आरोग्य उपकेंद्रात पाण्याची स्थायी व्यवस्था करावी आणि रिक्त पदे लवकरात लवकर भरून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news