

Municipal Council Reservation will be released today, attention of aspirants
विठ्ठल फुलारी
भोकर : नगर परिषदचे आरक्षण ६ ऑक्टोबर रोजी सुटणार असल्याने या आरक्षणाकडे सर्व राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक होण्याच्या दृष्टीने अनेकांना डोहाळे लागले असून काही भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आतापासून आपला हात सैल केला आहे. कोणी दुगदिवीला देणगी, कोणी शर्ट तर कोणी दस्तीचे वाटप करून आपण किती दानशूर आहोत याची जाणीव मतदारांना करून देत आहेत.
भोकरची नगर परिषद म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. यामुळे या नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून जाण्याची तळमळ अनेकांना लागून राहिली होती. सद्यपरिस्थितीत भोकरमध्ये नगरसेवक होण्यासाठी तब्बल चारशेच्या वर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर मोठा हातखंडा मारणारे पन्नास जण नगराध्यक्ष होण्यासाठी तयार आहेत. या सर्वांचे आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे नगराध्यक्ष पदाच्या आज सुटणाऱ्या आरक्षणाकडे लक्ष लागून आहे.
नगर परिषदच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने अनेक भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपण दानशूर असल्याचा आव आणत आहेत. नगराध्यक्ष पद ओबीसीला सुटले तर मीच भाजपाचा उमेदवार राहाणार असल्याचा दावा करत एकाने भोकरच्या अनेक दुगदिवी मंडळांना देणगी दिली. हा उमेदवार नगर परिषदमध्ये गेला तर मोठा हातखंडा मारतो, गरीबांना गुंठेवारीमध्ये पिळून खातो हे भोकर करांच्या चांगलेच लक्षात आहे. यामुळे भाजपाकडून एका डॉक्टरला उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू केली आहे.
काही भावी नगरसेवकांनी दानधर्म सुरू केला असून कोणी शर्ट तर कोणी दस्ती चे वाटप करून तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भोकर येथील ग्रामपंचायत बरखास्त करून खा. अशोकराव चव्हाण यांनी नगर परिषद अस्तित्वात आणली. शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. पाणी टंचाईचा गहन प्रश्न सोडवून शहराची तहान भागवली. यामुळे शहरातील नागरिक कमालीचे सुखावले होते.
पण हे सुख जास्त काळ टिकून राहिले नाही. नगर परिषद जसजसं बारसं धरू लागली तसंतसं लोकांच्या कामासाठी दलाली सुरू झाली. शहरातील नव्वद टक्के नागरिकांना नगर परिषदच्या कामासाठी आर्थिक झळ सहन करावी लागली. लोकप्रतिनिधींनी दलालीचा वेगळा पायंडा पाडला असल्याने आता नागरिकांच्या हे अंगवळणी पडले आहे. यामुळे या नगर परिषदमध्ये नगरसेवक व्हावे आणि थोडा कणा ताठ करून घ्यावा, असे सर्वांनाच वाटू लागले असल्याने इच्छुकांची गर्दी वाढत आहे.
भोकर नगर परिषदची निवडणूक २०२० ला होणार होती. या दरम्यान कोरोनाची पहिली लाट आली. आता निवडणुका होतील या आशेने कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक भावी नगरसेवकांनी दानधर्म सुरू केला. पण निवडणूक काही झाली नाही, आणि निवडणूक होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भावी नगरसेवकांनी दानधर्म बंद केला आणि आणि ते शांत झाले. आता निवडणुकीचे वारे पाहून आणखी दानधर्म सुरू झाले.