

लोहा: मुलाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. हा धक्का वडिलांना सहन झाला नाही. हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचाही मृत्यू झाला. तर मुलगा आणि पतीच्या अकाली निधनाने पत्नीलाही ह्रदयविकाराचा धक्का बसला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही हृदयद्रावक घटना लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे घडली. या दुर्दैवी घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुलापाठोपाठ वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ सावरगाव येथील बेदरे कुटुंबियांवर आली आहे. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. राहुल बेदरे (वय २७) आणि भीमराव बेदरे (वय ६०) असे मृत बाप लेकाचे नाव आहे.
सावरगाव नसरत येथील भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा एकुलता एक मुलगा होता. तो शेतीसह मिळेल, ते काम करत वडिलांना हातभार लावत होता. सोमवारी त्याने दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजदांरीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर पेरणीसाठी खत आणि बी बियाणी आणतो म्हणून निघून गेला. मात्र, शेतातील झाडास गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपवली. याचे कारण मात्र, स्पष्ट झाले नाही. दरम्यान, मुलाने उचललेल्या टोकाच्या पावलामुळे वडील भीमराव बेदरे यांना धक्का बसला होता. मंगळवारी त्याच्या अंत्यविधीनंतर घरी परतताच वडील भीमराव बेदरे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. मात्र, घरी आल्यानंतर गुरूवारी पहाटे ४ च्या सुमारास पुन्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगा आणि पती यांच्या निधनाचा विरह पत्नीलाही असाह्य झाला. तिला ही हृदयविकाराचा झटका आला नातेवाईकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.