

Achyut Tarke Khandoba Kesari
घुंगराळा (ता. नायगाव) येथील यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेत किवळा येथील अच्युत टरके याने दिल्लीच्या नामांकित पहिलवान नुकूल याला चित्त थरारक लढतीत पराभूत करत ‘खंडोबा केसरी’ या मानाच्या किताबावर आपले नाव कोरले. या कुस्तीचे रोख बक्षीस ३१,१११ रुपये होते. ही मानाची कुस्ती दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्यातर्फे कै. माधवराव आत्माराम पा. सुगावे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची गर्दी स्पर्धेचे उद्घाटन कुंटूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, उपअभियंता भुरे, जाधव, पोलीस उपनिरीक्षक नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंगोली, वाशीम, पंजाब, दिल्ली, लखनऊ आणि नांदेड जिल्ह्यातील बलदंड पहिलवानांनी मैदान गाजवले. तब्बल 250 ते 300 कुस्त्या धडाक्यात लावण्यात आल्या. दुपारी १ वाजता सुरू झालेला कुस्त्यांचा घमासान अखेर रात्री ८.३० वाजेपर्यंत रंगला.
खंडोबाच्या यात्रेतील कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी ३ ते ४ हजार कुस्तीप्रेमींची प्रचंड गर्दी उसळली होती. पंच म्हणून केरबा सुगावे, संभाजीराव तुरटवाड, साईनाथ सुगावे, व्यंकट यलपलवाड, श्यामराव यमलवाड, मुरहरी तुरटवाड, प्रल्हाद ढगे आदींनी जबाबदारी पार पडली.
कुस्ती स्पर्धेचे नियोजन नागोराव दंडेवाड, श्यामसुंदर ढगे, बालाजीराव मातावाड, शिवाजी ढगे, सरपंच गोविंदराव पांचाळ, ग्रामसेवक हणमंत शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, कार्यकर्ते, यात्रा समितीच्या सदस्यांनी केले.
समालोचनाची बाजू पहिलवान भालचंद्र (हिंगोली) आणि प्रा. माधवकुमार यमलवाड यांनी सांभाळत हलगीच्या तालावर संपूर्ण स्पर्धेला रंगत आणली.