

उमरी: गोदावरी नदीच्या 'बॅक वॉटर'मुळे शेतजमीन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. याच नैराश्येने ग्रासलेल्या आणि कर्जाच्या वाढत्या बोजामुळे हताश झालेल्या उमरी तालुक्यातील हस्सा येथील एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले. माधव बाबाराव कदम (वय ४४) शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत जीवन संपवले.
हृदयद्रावक घटना १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे हस्सा आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, कदम यांच्या वडिलांच्या नावावर असलेली जेमतेम शेती गोदावरी नदीच्या बॅक वॉटरमुळे पूर्णपणे नष्ट झाली. उभे पीक वाया गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यातच गतवर्षी मुलीचे लग्न केल्यामुळे झालेला खर्च आणि यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली.
लोकांचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अखेर त्यांनी जीवन संपवण्याचा अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. बुधवारी (दि.१६ ऑक्टो) रात्री उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर शोकाकुल वातावरणात हस्सा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधव कदम यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने कदम कुटुंबावर मोठा आघात झाला असून, उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली आहे.