

नांदेड: राज्य विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक घेतली जात आहे. या मतदारसंघात तब्बल ३८ वर्षांनंतर पोटनिवडणूक होत असून पहिल्यावेळी अशोक शंकरराव चव्हाण यांचे राजकीय पदार्पण झाले होते. आता दुसरे म्हणजे प्रा. रवींद्र चव्हाण हे पदार्पणातच लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. हा विजय प्राप्त करताना त्यांनी नांदेड मतदारसंघ भाजपामुक्त केला खरा, पण पुढे तीन महिन्यांनी त्यांचे अकाली निधन झाल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. आता होत असलेल्या पोटनिवडणुकीमुळे भाजपाला आपला झेंडा फडकविण्याची संधी मिळाली असली, तरी नांदेडमध्ये पूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली जागा राखली होती.
एका फेरनिवडणुकीत हाच पक्ष विजयी झाला होता. ही परंपरा कायम राहणार, का तुटणार याचा फैसला दोन आठवड्यांनी होईल. नांदेड मतदारसंघातील पहिली पोटनिवडूक १९८७ साली तत्कालीन लोकसभा सदस्य शंकरराव चव्हाण यांनी राजीनामा दिल्यामुळे घ्यावी लागली. तत्पूर्वी १९८४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शंकरराव मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पोटनिवडणुकीत काँग्रेसने शंकररावांचे पुत्र अशोक चव्हाण यांना संधी दिली तर विरोधकांनी प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीस पाठिंबा देत लढत लक्षवेधी केली, पण जिल्ह्यात तेव्हा काँग्रेसचे वर्चस्व होते. त्या बळावर अशोक चव्हाण विजयी झाले. त्यानंतर चार वर्षांनी नांदेडमध्ये निवडणुकीतील एका उमेदवाराच्या निधनामुळे प्रक्रिया थांबवावी लागली होती. नंतर काही महिन्यांनी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील विजयी झाल्या.
जिल्ह्यात काही मतदारसंघांमध्ये विधानसभेचीही पोटनिवडणूक झाली. १९९२ ९३ साली किनवट, २०१५ मध्ये मुखेड आणि २०२१ मध्ये देगलूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत किनवटचा अपवाद वगळता दिवंगत आमदारांच्या राजकीय वारसालाच मतदारांनी कौल दिला. त्या परंपरेनुसार काँग्रेसचे रवींद्र चव्हाण लोकसभेसाठी मतदारांना सामोरे जात आहेत. शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या समकालीन नेत्यांनंतर नांदेडमधील काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण यांनी समर्थपणे पेलले. निवडणुकीच्या राजकारणाला त्यांनी 'अर्थपूर्ण' वळण दिल्यामुळे जिल्ह्यातील फुटकळ निवडणुकाही खर्चिक झाल्या.
गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला होता, पण जिगरबाज म्हणून ओळखल्या जाणार्या वसंत चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवून पक्षाला यश मिळवून दिल्यामुळे अशोक चव्हाण यांचा भाजपाप्रवेश त्या पक्षासाठी लाभदायी उरला नाही, मुंबई-दिल्लीतील भाजपा नेत्यांची त्यांनी निराशा केली.
या पार्श्वभूमीवर आता होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण- पाटील यांच्याविरुद्ध संतुक हंबर्डे देशमुख यांना भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे जिल्ह्यात निर्णायक असलेल्या मराठा समाजासमोर पाटील विरुद्ध देशमुख अशी लढत उभी राहिली आहे.
भाजपाने पूर्वी डॉ. धनाजीराव देशमुख यांना तीन वेळा संधी दिली होती, पण त्यांना एकदाही यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर देशमुखांवर लागलेला अपयशाचा शिका पुसण्याचे आव्हान संतुक हंबर्डे यांच्यासमोर असून त्यांची या निवडणुकीत परीक्षा असली, तरी अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे भाजपातील स्थान मजबूत करण्याची एक कसोटी आहे.