

Lightning Strike: Girl killed by lightning; ten livestock dead
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेला वादळी बारा, विजेच्या कडकडाटसह झालेल्या अवकाळीच्या तडाख्याने रब्बी पिकांसह, फळबागा, बागायत शेतीचे नुकसान झाले आहे. देगलूर तालुक्यात वीज पडून एक मुलगी, आठ जनावरे, लोहा तालुक्यात दोन जनावरे, धर्माबाद तालुक्यात पाच मेंढ्या, एक हजार कोंबड्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला असून, नदिड जिल्ह्यात सोमवार व मंगळवार असे सलग दोन दिवस ढगाळ वातावरण होते. मध्यरात्रीच्या सुमारास नांदेड, देगलूर, धर्माबाद, लोहा, कंधार, हदगाव, मुखेड, बिलोली, उमरी, हिमायतनगर या तालुक्यांत विजेच्या कडकडाटासह वादळी वारा, अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बीच्या ज्वारी, गहु, हरबरा पिकांचे नुकसान झाले. तसेच हळद, केळी, टरबूज, आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
देगलूर तालुक्यातील माळेगाव मक्तास येथे वादळी वाऱ्यामुळे अंबा फळांची गळती मोठ्या प्रमाणात झाली. काढणीला आलेल्या गहू, ज्वारी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. वाऱ्यामुळे गहू, रब्बी पिके भुईसपाट झाली. गारपिटीचा मारा बसल्याने रब्बी पिकांच्या कणसातील दाण्यांची चादरच शेत जमीनीवर पसरल्याचे विदारक दृश्य पाहण्यास मिळाले आहे. सोमवारी सायंकाळी माळेगाव मक्ता परिसराला गारपिटीचा तडाखा बसल्याचे वृत्त समजताच देगलूर उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, तहसीलदार भारत सूर्यवंशी यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मंगळवारी महसूल व कृषी विभागाच्या पथकाला माळेगाव परिसरात पाठवले.
शेतकऱ्यांना राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी माळेगावचे माजी उपसरपंच तथा ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद उमाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
देगलूर तालुक्यातील शिळवणी येथे सोमवारी दीपाली संजय पवार (१६) हिचा शेतात काम करताना वीज पडून मृत्यू झाला. तर बेम्बरा, बिजलवाडी, कुन्मारपल्ली या ठिकाणी आठ जनावरे दगावली. धर्माबाद तालुक्यातील विळेगाव येथील गंगाधर पाटील शिवशेट्टे यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील एक हजार कोंबड्या दगावल्या, तर रत्नाळी येथील विरप्पा गंगाधर मदनुरकर या मेंढपाळ्याच्या पाच मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. मंगळवारी लोहा तालुक्यात दोन बैल दगावले आहेत.