

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील बामनगुडा येथे शेतात कापूस वेचणी करत असताना लता सुरेश तोडसाम (वय 35 ) या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात तिच्या गालावर खोलवर जखम झाली आहे. गंभीर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 23) दु. 2 वाजताच्या सुमारास घडली.
लता सुरेश तोडसाम (वय 35) ही कापूस वेचत असताना शेतालगतच्या जंगलातून बिबट्याने अचानक तिच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात तिच्या गालावर, कपाळावर व मानेवर जबर जखम झाली आहे. आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पतीने इतरांच्या मदतीने महिलेल्या सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तिथे प्राथमिक उपचार करून तिला माहूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तिला यवतमाळला पाठविले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून संबंधित बिबट्या नरभक्षी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तात्काळ पावले उचलून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.