

Landowner himself was pushed into a pit for secret money
बिलोली, पुढारी वृत्तसेवा :
आजच्या आधुनिक आणि विज्ञानवादी युगातही नरबळीसारख्या अघोरी प्रथा जिवंत असल्याचा धक्कादायक प्रकार बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे उघडकीस आला आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका वृद्ध जमीन मालकाचाच बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सुदैवाने ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी भोंदू बाबासह १२ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गंजगाव येथील दत्ताराम विठोबा पाटील जाधव यांची जुन्या गावात पडीक जमीन आहे. २० जानेवारीच्या रात्री १० ते ११ च्या सुमारास संशयित आरोपींनी या जागेत गुप्तधन असल्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी पूजा मांडली होती.
यासाठी चक्क जेसीबी बोलावून मोठे खड्डे खोदण्यात आले होते. आरोपींनी कट रचून दत्ताराम पाटील यांना "काही काम आहे" असे खोटे सांगून घटनास्थळी बोलावून घेतले. दत्ताराम पाटील तेथे पोहोचले असता, त्यांना लिंबू, काळ्या कापडाच्या बाहुल्या, पत्रवाळी पूजन आणि इतर अघोरी साहित्य दिसले. जेव्हा त्यांनी या प्रकाराला विरोध केला, तेव्हा उपस्थित आरोपींच्या अंगात जणू सैतान संचारला.
"तूच या जागेचा मालक आहेस, तुझाच बळी दिल्याशिवाय धन मिळणार नाही," असे ओरडत आरोपींनी त्यांना जेसीबीने खोदलेल्या खोल खड्ड्यात ढकलून दिले आणि त्यांना जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यात पडल्यानंतर दत्ताराम यांनी जीवाच्या आकांताने आरडा-ओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेज- ारच्या शेतातील शेतकरी धावून आले.
त्यांनी तातडीने दत्ताराम यांचा मुलगा गोविंद जाधव व नातवाला माहिती दिली. कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेताच, आपली धरपकड होईल या भीतीने आरोपींनी तिथून पळ काढला. या थरारक घटनेनंतर दत्ताराम पाटील यांनी २२ जानेवारी रोजी बिलोली पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे.