

Kinwat Srikant Kancharlawar murder case
किनवट: किनवट शहरातील अक्षय ज्वेलर्सचे मालक श्रीकांत कंचर्लावार यांच्या खूनप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्या न्यायालयाने तिघा आरोपींना दहा वर्षांची सक्त मजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
किनवट येथील भोई गल्लीमध्ये कंचर्लावार यांच्या मालकीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाच्या वादातून झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेत श्रीकांत कंचर्लावार यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशन किनवट येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय अधिकारी विजय डोंगरे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी अत्यंत कौशल्यपूर्णरीत्या करून भक्कम पुरावे न्यायालयासमोर मांडले. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता महंमद अब्बास यांनी बाजू मांडली.
न्यायालयाने आरोपी संतोष शिवराम कोल्हे (वय 47), विशाल अशोक कोल्हे (वय 27) व विकास उर्फ विक्की अशोक कोल्हे (वय 34, सर्व रा. भोईगल्ली, किनवट, जि. नांदेड) यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
या खटल्यात पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे (प्रभारी अधिकारी, पो.स्टे. किनवट) यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ विजय वाघमारे यांनी कामकाज पाहिले. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या प्रकरणी तातडीने तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्याबद्दल किनवट पोलिसांचे आणि पैरवी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.