

Kinwat Rabi sowing news
किनवट : किनवट तालुक्यात रब्बी हंगाम 2025-26 मध्ये 24 हजार 330.80 हेक्टर नियोजित क्षेत्राच्या तुलनेत 32 हजार 322.40 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून सरासरीच्या 132.85 टक्के रब्बी पेरणी झाल्याची नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अंतिम अहवालात करण्यात आली आहे.
बेमोसमी पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसल्यानंतर रब्बी पेरणीही सुरुवातीला रखडली होती. ऑक्टोबरअखेरपर्यंत ढगाळ हवामान, सातत्याने झालेला परतीचा पाऊस आणि वाफसा नसल्यामुळे पेरणी मंदगतीने सुरू होती. कोवळ्या पिकांवर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन काही काळ पेरणी थांबवण्यात आली होती. पुढे पाऊस थांबून थंडी वाढल्यानंतर पेरणीला वेग आला.
तृणधान्य पिकांमध्ये यंदा मका पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. मक्याची सरासरी पेरणी 3 हजार 537.80 हेक्टर असताना प्रत्यक्षात 10 हजार 185 हेक्टरवर पेरणी झाली असून ती सरासरीच्या 287.89 टक्के आहे. गहू पिकाची पेरणीही मोठ्या प्रमाणात वाढली असून 4 हजार 784.80 हेक्टरच्या तुलनेत 8 हजार 790 हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची पेरणी 2 हजार 276.40 हेक्टरच्या तुलनेत 2 हजार 661 हेक्टरवर झाली आहे.
मागील दोन-तीन वर्षांपर्यंत हरभरा पिकाकडे असलेला शेतकऱ्यांचा कल यंदा कमी झाल्याचे चित्र आहे. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र 13 हजार 456.60 हेक्टर असताना प्रत्यक्षात 9 हजार 780 हेक्टरवरच पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस उशिरा झाल्याने वाफसा येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे उन्हाळी पिकासाठी तसेच कोरडवाहू जमिनीच्या चांगल्या मशागतीसाठी रब्बीमध्ये मका व गहू पेरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.
गळीतधान्य पिकांमध्ये तिळासाठी 8.40 हेक्टरचे नियोजन असतानाही एकाही शेतकऱ्याने तिळाची पेरणी केलेली नाही. करडईसाठी 11.20 हेक्टरचे सरासरी क्षेत्र असतानाही केवळ एक हेक्टरवरच करडईची पेरणी झाली आहे. नगदी पिकांमध्ये केळी 15 हेक्टर, ऊस 59 हेक्टर, कांदा 6 हेक्टर तर धने 96 हेक्टरवर पेरण्यात आली आहे. याशिवाय विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची पेरणी 607 हेक्टरवर झाल्याची नोंद अंतिम अहवालात करण्यात आली आहे.