

किनवट (नांदेड) : किनवट नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी प्रमुख पक्षांनी नगराध्यक्षपद आणि प्रभागनिहाय उमेदवारांची घोषणा न केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून विविध पक्षांकडून इच्छुकांच्या बैठका, चर्चा आणि मुलाखतींची प्रक्रिया सुरू असली तरी अंतिम निर्णय अद्याप गूढच ठेवण्यात आला आहे.
सत्ताधारी भाजपकडे नगराध्यक्षपदासह २१ नगरसेवकपदांसाठी तब्बल शंभरहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या मुलाखतींमध्ये भाजपचे नांदेड उत्तरच्या प्रभारी आमदार श्रीजया चव्हाण, आमदार भीमराव केराम, तसेच जिल्हा पदाधिकारींमध्ये पक्ष निरीक्षक नारायण श्रीमनवार व नरेंद्र चव्हाण उपस्थित होते. मुलाखतीनंतर उमेदवार निवडीचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात आला असून, नगराध्यक्षपदासाठी अंतर्गत स्पर्धा चुरशीची असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सौ. सुजाता एंड्रलवार यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी सुचवून प्रारंभिक हालचाल केली असली, तरी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) या तीन पक्षांमध्ये संभाव्य आघाडीबाबत चर्चा सुरू होती; मात्र मतभेदांमुळे ही आघाडी साकार होण्याची शक्यता अल्प आहे.
दरम्यान, भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिव सेना (शिंदे गट) युतीची शक्यता किनवटपुरती तरी मावळलेली दिसते. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये एकवाक्यता होत नसल्याचे चित्र आहे.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे किनवट तालुका अध्यक्ष बाळू पाटील पवार यांनी सांगितले की, "सोमवारी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मुलाखती घेतल्या असून, किनवट नगरपरिषदेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढविणार आहोत. नगराध्यक्षासह सर्व १० प्रभागांसाठी उमेदवारांची प्राथमिक यादी तयार आहे."
त्याचप्रमाणे, काँग्रेस शहराध्यक्ष गिरीश नेम्मानीवार यांनी सांगितले की, "काँग्रेसनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, सर्व प्रभागांत पक्षाचे उमेदवार उभे राहतील."
दरम्यान, निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी काहीच दिवस उरले असताना उमेदवार निश्चित न झाल्याने सर्वच पक्षांमध्ये गडबड उडाली आहे. अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यास कागदपत्रांची पूर्तता आणि प्रचाराची रणनिती आखण्यासाठी इच्छुकांना मोठी धावपळ करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर किनवट नगरपरिषदेतील सत्ता कोणाच्या हातात येते, हे पाहण्यासाठी नागरिक उत्सुकतेने डोळे लावून बसले आहेत.