

उमरी (जि. नांदेड) पुढारी वृत्तसेवा
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उमरी तालुक्यातील बोळसा बुद्रुक गावातील तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोपान मारोती डिडेवार (वय 26) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
11 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. जेव्हा गावातील आणि घरच्यांना ही माहिती समजली, तेव्हा त्यांनी तात्काळ शेतात धाव घेतली आणि सोपान यांना खाली उतरवून उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टर नितीन कुरे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक चंद्रप्रकाश गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.एम. सूर्यवंशी तपास करीत आहेत.
मयत शेतकरी सोपान डिडेवार हे जेमतेम तीन एकर शेतीचे मालक होते. शिक्षणाने ते दहावीपर्यंत शिकले होते. कुटुंबात आई-वडील, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. शेती आणि मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. घेतलेले कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी कशी करावी या चिंतेने ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. अखेर त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.
मंगळवारी संध्याकाळी गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने बोळसा बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे.