

Nanded District Bank Election of Director and Vice-Chairman
नांदेड : विशेष प्रतिनिधी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात रविवारी शांतता होती. पण एक संचालक आणि नवीन उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस तेथे घडामोडी बघायला मिळतील. मधल्या काळात ठप्प झालेल्या 'बोलाचाली' बाहेर सुरू आहेत.
ज्येष्ठ कार्यकर्ते हरिहरराव भोसीकर यांच्या निधनामुळे बँकेमध्ये एक संचालकपद आणि उपाध्यक्षपद रिक्त झाले असून ही दोन्ही पदे भरण्यासाठी राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार जिल्हा उप निबंधक (सह. संस्था) यांनी २१ आणि २२ जुलै रोजी संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित केली आहे.
मागील वर्षी बँकेचे ज्येष्ठ संचालक, खा. वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र खा. रवींद्र चव्हाण यांची नंतर बिनविरोध निवड झाली होती. आता त्याच धर्तीवर हरिहर भोसीकर यांचे चिरंजीव शिवकुमार भोसीकर यांना संचालक मंडळावर संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिवकुमार यांच्या नावाला संमती देत, बँकेच्या संचालक मंडळातील पक्षाच्या प्रतिनिधींना तशी सूचना दिली असल्याचे सांगण्यात आले. मधल्या काळात खा. अशोक चव्हाण यांनी आपले समर्थक बालाजी पांडागळे यांची भोसीकरांच्या जागी नियुक्ती होऊ शकेल काय, याची चाचपणी करून पाहिली. पण त्यास कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.
बँकेचे माजी अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी शनिवारी झालेल्या एका बैठकीस रवींद्र चव्हाण आणि नागेश पाटील आष्टीकर या दोन्ही (संचालक) खासदारासंह इतर काही संचालक हजर होते. या बैठकीत शिवकुमार भोसीकर यांना संचालक मंडळात सामावून घेण्याचे जवळपास ठरल्यामुळे सोमवारच्या बैठकीत त्यासंबंधीची औपचारिकता पूर्ण केली जाईल. शिवकुमार भोसीकर यांच्याकडे आवश्यक असलेली पात्रता असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले. भोसीकरांखेरीज इतर कुठलेही नाव समोर आलेले नाही. त्यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आपला बँकेतील प्रवेश निश्चित केला असल्याचे सांगण्यात आले.
संचालकाची रिक्त जागा भरण्यात आल्यानंतर मंगळवारी बँकेचे उपाध्यक्षपद भरण्याची प्रक्रिया संचालक मंडळाच्या बैठकीत केली जाणार आहे. या पदासाठी काँग्रेसचे माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हालचाली मागील महिनाभरापासून सुरू होत्या. खा. रवींद्र चव्हाण व इतर संचालकांचे बळ त्यांनी आपल्यामागे उभे केले आहे. त्यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी खा. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. मागील काळात बेटमोगरेकर यांचे अध्यक्षपद हुकले होते. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाच्या उर्वरित जेमतेम आठ महिन्यांच्या कालावधीसाठी आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे, अशी भूमिका त्यांनी सर्वांसमोर मांडल्यामुळे त्यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे.