

Civil Judge Senior Division
मुखेड : मुखेड येथील कार्यरत जोड न्यायालयाऐवजी (लिंक कोर्ट) आता दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचे स्वतंत्र आणि नियमित न्यायालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, न्यायालयाला पदनिर्मितीसह मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांसाठी नागरिकांना जिल्हा न्यायालयात जावे लागत होते. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होत होते. अनेकदा खटल्यांच्या सुनावणीसाठी वारंवार ये-जा करावी लागत असल्याने पक्षकारांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता मुखेड येथेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराचे स्वतंत्र न्यायालय सुरू होणार असल्याने नागरिकांची ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. तसेच तालुक्यातील प्रलंबित खटले जलदगतीने निकाली निघतील, असा विश्वास आमदार डॉ. तुषार राठोड यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळावा, त्यांचा वेळ व पैसा वाचावा, यासाठी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी स्वतंत्र न्यायालयाच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, न्यायालयाच्या मंजुरीमुळे मुखेडच्या न्यायव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.