

Highest number of applications for the post of mayor in Chavan's area of influence!
विशेष प्रतिनिधी
नांदेड : जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता विहित मुदतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाल्यानंतर सबंध जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या भोकर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असल्याचे स्पष्ट झाले. त्याखालोखाल मुदखेड नगरपरिषदेत १६ जणांनी शहराच्या प्रथम नागरिक पदासाठी अर्ज भरले आहेत. या दोन्हीं नगरपालिका खा. अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील आहेत.
दरम्यान २६९ जागांपैकी केवळ एक जागा छाननी प्रक्रियेनंतर बिनविरोध निघाली असून हा मान मुखेड नगरपरिषदेत प्रभाग ४-अ मध्ये भाजपाच्या स्नेहा संजय तमशेट्टे यांना मिळाला आहे. या युवतीने मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले आणि आता पहिल्यावहिल्या निवडणुकीत बिनविरोध नगरसेवक होण्याचा मान प्राप्त केला. मुखेड नगरपरिषदेत भाजपा आमदार डॉ. तुषार राठोड व त्यांच्या परिवाराने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तेथे नगराध्यक्षपदासाठी ७तर नगरसेवकपदासाठी ८० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
भाजपा नेते, खासदार अशोक चव्हाण आणि त्यांची आमदार कन्या श्रीजया यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या मुदखेड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी १६ अर्ज वैध ठरले तर नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी १३६ अर्ज वैथ उरले. भोकर नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी ३२ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर २१ अर्ज वैध ठरले.
भोकरमध्ये नगरसेवकपदासाठी १५८ अर्ज आहेत. मागील काठी विधानसभा निवडणुकांतही भोकर मतदारसंघात मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. पण माघारीच्या मुदतीदरम्यान 'अर्थपूर्ण' तोडपाणी केल्यानंतर अनेक उमेदवारांनी सन्मानपूर्वक माघार घेतल्याचे दिसून आले होते. आता नगराध्यक्षपदासाठीही त्याच धर्तीवर मोठ्या संख्येने अर्ज आले असावेत, असे मानले जात आहे.
बिलोली नगरपालिकेत भाजपाने पळ काढल्याची बाब जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत आहे. या पालिकेत अध्यक्षपदासाठी १९ अर्ज, कुंडलवाडीमध्ये ४ आणि देगलूरमध्येही ७ अर्ज आहेत. तेलंगणाच्या सीमेवरील किनवट नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. किनवट नगरपरिषदेत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असतानाही भाजपाच्या स्थानिक आमदाराने पुत्रहट्टातून तेथे ओबीसी महिला उमेदवार दिल्यामुळे अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या ९ सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची निराशा झाली. भाजपाच्या या निर्णयामुळे पक्षाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपा यांच्यामध्ये उमरी नगरपरिषदेत घेट लढत होणार असून तेथे नगराध्यक्षपदासाठी ४ अर्ज वैध ठरले तर नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ६२ अर्ज वैध ठरले. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या लोहा नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी केवळ ३ उमेदवार आहेत तर नगरसेवकपदाच्या २० जागांसाठी ७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, कंधारमध्ये नगराध्यक्षपदासाठी ५ तर नगरसेवकपदासाठी १०० उमेदवार आहेत.
हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी १०२ अर्ज वैध ठरले. हदगाव नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी ११ तर नगरसेवकपदासाठी १०२ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले, नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अजपैिकी प्रमुख राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये बाद झाला नाही. छाननी प्रक्रिया झाल्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्षांची आघाड़ी काही नगरपरिषदांमध्ये आकार घेत असल्याचे दिसून आले. लोहा, कंधार, देगलूर, किनवट, हिमायतनगर ३. संस्थांमध्ये काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी होत असल्याचे दिसून आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामुख्याने धर्माबाद, उमरी, कंधार, लोहा, बिलोली आणि कुंडलवाडी या नगरपालिकांमध्ये जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.
जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या दोन सहायकांची नेमणूक एका आदेशाद्वारे केली होती. पण त्यानंतर बिलोली, कुंडलवाडी आणि हिमायतनगर या तीन ठिकाणी आधीच्या आदेशामध्ये काही बदल करून सुधारित आदेश जारी करण्यात आला.